NEET पेपर फुटीप्रकरणी तिघांची चौकशी; CBI चे पथक लातुरात धडकले, प्रक्रिया अंतिम टप्प्यात
By राजकुमार जोंधळे | Published: July 1, 2024 05:11 AM2024-07-01T05:11:43+5:302024-07-01T05:12:59+5:30
नीट गुणवाढ संदर्भातील लातुरात अटक असलेले दाेघे, दिल्लीतील गंगाधार यांच्यातील मध्यस्थ असलेला इरण्णा काेनगलवार आठवडाभरातनंतरही पाेलिसांच्या हाती लागला नाही.
लातूर - नीट गुणवाढीसंदर्भात लातुरात दाखल गुन्ह्याचा तपास आता सीबीआय करणार असून, हे पथक लातुरात धडकल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यांच्याकडून दिल्लीतील गंगाधार अन् लातूर जिल्ह्यातील दाेघा आराेपींची चाैकशी केली जाणार आहे. या प्रकरणाचा प्राथमिक तपास लातूर पाेलिसांनी केला असून, सीबीआयकडे तपास वर्ग करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, साेमवारपासून पुढील प्रक्रिया, तपास सीबीआय करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
नीट गुणवाढीसंदर्भातील प्रकरणात लातुरात अटक करण्यात आलेल्या मुख्याध्यापक जलीलखाॅ पठाण आणि शिक्षक संजय जाधव यांच्या चाैकशीत अनेक धक्कादायक संदर्भ तपास यंत्रणांच्या हाती लागले असून, त्या संदर्भाचा धागा पकडूनच पुढीत तपास सीबीआय करणार आहे. लातुरात अटक केलेल्या दाेघांची पाेलिस काेठडीची मुदत २ जुलैराेजी संपणार आहे. त्यानंतर त्यांना पुन्हा लातूर न्यायालयात हजर करण्यात येईल. पुढील चाैकशीसाठी सीबीआय त्यांना ताब्यात घेणार आहे. यासाठी हे पथक रविवारी लातुरात धडकले आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्यांनी दिली.
तपास यंत्रणांनी घेतले न्यायालयाचे मार्गदर्शन...
अटकेतील दाेघांची चाैकशी सुरु आहे. इतर आराेपी एकत्र आल्याशिवाय चाैकशी पूर्ण हाेणार नाही, असे पाेलिसांनी न्यायालयात सांगितले. दाेघांना न्यायालयीन काेठडीत पाठवावे का? अशी विनंती न्यायालयाला केली. त्यावर आराेपी न्यायालयीन काेठडीत असला तरी चाैकशीसाठी पुन्हा बाेलवता येते, असे लातूर न्यायालयाने सांगितले.
आठवड्यानंतरही इरण्णा हाती लागेना...
नीट गुणवाढ संदर्भातील लातुरात अटक असलेले दाेघे, दिल्लीतील गंगाधार यांच्यातील मध्यस्थ असलेला इरण्णा काेनगलवार आठवडाभरातनंतरही पाेलिसांच्या हाती लागला नाही. त्याच्या अटकेसाठी विविध पथके तैनात आहेत. मात्र, त्यांना गुंगारा देत ताे पसार आहे. ताे हाती लागला तरच या प्रकरणातील इतर मासे गळाला लागणार आहेत, असेही सूत्रांनी सांगितले.