लिफ्टच्या बहाण्याने लुटणाऱ्या तिघांना अटक
By admin | Published: February 5, 2017 10:09 PM2017-02-05T22:09:10+5:302017-02-05T22:09:10+5:30
प्रवासी वा लिफ्टच्या बहाण्याने कारमध्ये बसवून घेतलेल्या प्रवाशास मारहाण करून लुटणारे गजाआड
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 5 - द्वारका सर्कलजवळून प्रवासी वा लिफ्टच्या बहाण्याने कारमध्ये बसवून घेतलेल्या प्रवाशास मारहाण करून लुटणारे पिंपळगाव बसवंत येथील तीन सराईत गुन्हेगारांना नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने नांदगाव परिसरातून शनिवारी (दि़४) रात्रीच्या सुमारास अटक केली़ ओझर, पिंपळगाव तसेच नाशिकमध्ये केलेल्या चार गुन्ह्यांची संशयितांनी कबुली दिली असून त्यांच्याकडून अल्टो कार, चोरीचे मोबाईल व रोकडसह २ लाख ६६ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़
प्रवाशांना लुटणारे संशयित लाल रंगाच्या अल्टो कारमधून मनमाड- नांदगाव रोडने येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना मिळाली होती़ त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचाऱ्यांना पेटोलिंगचे आदेश दिले होते़ त्यानुसार पोलीस कर्मचारी शनिवारी रात्री नांदगाव पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना लाल रंगाची अल्टो कार (एमएच ०६ एबी ४६७) संशयास्पदरित्या जात असल्याचे आढळून आले व त्यांनी या कारचा पाठलाग करून हॉटेल खूशबू गार्डनजवळ कारसह तिघा संशयितांना ताब्यात घेतले़.
पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या अल्टो कारमध्ये सराईत गुन्हेगार प्रतीक पांडुरंग मातेरे (रा. संतोषी माता नगर, पिंपळगाव बसवंत), रोहित केशव गायकवाड (रा. शिवाजी नगर, पिंपळगाव बसवंत) व रवींद्र दादाश्री केदारे ( रा. पिंपळगाव एमआयडीसी, गोंडेगाव) हे तिघे होते़ त्यांच्याकडून लाल रंगाची अल्टो कार (एमएच ०६ एबी ४६७), चोरीचे ६ मोबाईल, १५,३७० रुपयांची रोकड व हत्यारे असा २ लाख ६६ हजार ३७० रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे़.
ओझर, पिंपळगाव व नाशिक शहरातील भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत दोन लुटीचे गुन्हे केल्याची कबुली या तिघा संशयितांना पोलिसांकडे दिली आहे़ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र रणमाळे, बालाजी मुसळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक अरूण पगारे, हवालदार किरण मोरे, रविंद्र वानखेडे, कैलास देशमुख, संजय पाटील, मुशीर सय्यद, विष्णू जुंदरे, राजू पाटील, जेक़े़सूर्यवंशी, पोलीस शिपाई हेमंत गिलबिले, गणेश नरोटे, प्रदीप बहिरम, मंगेश गोसावी यांनी ही कारवाई केली.