डिप्लोमाच्या एक लाख जागांसाठी तीन फेऱ्या; एसईबी विद्यार्थ्यांसाठी १० टक्के जागा आरक्षित
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 10:04 AM2024-05-29T10:04:32+5:302024-05-29T10:05:55+5:30
यंदा डिप्लोमा प्रवेशात एसईबीसी (मराठा आरक्षण) विद्यार्थ्यांसाठी १० टक्के जागा आरक्षित असतील.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: दहावीनंतरच्या पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमाच्या जवळपास ४०० शिक्षण संस्थांमधील एक लाख पाच हजार जागांच्या प्रवेशासाठी तीन कॅप फेऱ्या घेण्यात येणार आहेत. यंदा डिप्लोमा प्रवेशात एसईबीसी (मराठा आरक्षण) विद्यार्थ्यांसाठी १० टक्के जागा आरक्षित असतील. वर्किंग प्रोफेशनल आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश देण्यात येणार आहे.
तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत डिप्लोमाची प्रवेशप्रक्रिया राबविली जाते. मंगळवारपासून २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशाची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली. डिप्लोमाला २०२०-२१ मध्ये उपलब्ध जागांच्या ६० टक्के इतके प्रवेश झाले होते. ही टक्केवारी २०२३-२४मध्ये ८७ वर गेली आहे. गेली चार वर्षे डिप्लोमा प्रवेशांत वाढ होत आहे. डिप्लोमात सिव्हील, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, अणुविद्युत, कॉम्प्युटर, केमिकल या मुख्य शाखा आहेत. डिप्लोमाच्या प्रवेशासाठी तंत्रशिक्षण विभागाच्या https://dte.maharashtra.gov.in या वेबसाइटवर नोंदणी करता येईल.
डिप्लोमाचे प्रवेश
वर्ष शिक्षणसंस्था झालेले प्रवेश प्रवेशाची टक्केवारी
- २०२०-२१ ३७६ ६२,१२२ ६०
- २०२१-२२ ३६७ ६९,७०५ ७०
- २०२२-२३ ३६५ ८४,४५२ ८५
- २०२३-२४ ३८८ ८६,४६५ ८७
यंदा उपलब्ध जागा
- ३९० संस्था
- १.०५ लाख जागा
- ३१६ प्रवेशासाठी सुविधा केंद्रे
- ३ कॅप फेऱ्या
ठळक बदल
- एसईबीसी विद्यार्थ्यांसाठी एकूण प्रवेश क्षमतेच्या १० टक्के जागा आरक्षित
- थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी वर्किंग प्रोफेशनलकरिता स्वतंत्र तुकडी. हे वर्ग सकाळी, रात्री व सुटीच्या दिवशी घेण्यात येतील.
- थेट द्वितीय वर्षासाठी प्रवेश - विद्यार्थ्याना पदविका अभ्यासक्रमाची शाखा त्याने बारावी परीक्षेत उत्तीर्ण केलेल्या विषयानुसार निवडता येईल.