जहाजाच्या स्वच्छतेवेळी तीन खलाशांचा मृत्यू
By admin | Published: February 12, 2017 02:07 AM2017-02-12T02:07:57+5:302017-02-12T02:07:57+5:30
भरसमुद्रात धान्यवाहू बार्जच्या सफाईसाठी उतरलेल्या एका खलाशाला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याच्या बचावासाठी अन्य खलाशी खाली उतरले. मात्र त्याच दरम्यान आतील विषारी
मुंबई : भरसमुद्रात धान्यवाहू बार्जच्या सफाईसाठी उतरलेल्या एका खलाशाला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याच्या बचावासाठी अन्य खलाशी खाली उतरले. मात्र त्याच दरम्यान आतील विषारी वायूच्या संपर्कात आल्याने त्यापैकी तिघांना जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना शुुक्रवारी घडली. तिघा जखमींवर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी यलोगेट पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
अरबी समुद्रात साडेचार नाविक मैल अंतरावर एमव्ही ओरियन - २ या धान्यवाहू बार्जमध्ये धान्य भरण्यात येत होते. अचानक सांडपाण्याची टाकी जास्त भरल्याने जहाज एका दिशेला कलले. पातळी कमी करण्यासाठी तात्काळ एक खलाशी आत उतरला. मात्र आत उतरताक्षणी त्याला अस्वस्थ वाटू लागले आणि तो तिथेच कोसळला. त्याला वाचविण्यासह आतील सफाईसाठी बार्जच्या मास्टरसह इतर खलाशी उतरले, त्यांनाही आतील विषारी वायूने अस्वस्थ वाटू लागले. बार्जच्या पोकळीमध्ये साचलेले पाणी आणि धान्य यामुळे तयार झालेल्या विषारी वायूच्या संपर्कात आल्याने त्यांना हा त्रास झाला. घटनेची माहिती मिळताच कोस्ट गार्ड बोट क्रमांक सी. १५४ तेथे दाखल झाली. त्यांनी सर्वांना बोटीतून इंदिरा डॉक येथे आणण्यात आले. तेथून त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे तिघांना मृत घोषित करण्यात आले. मंगेश भोसले (२७), जयंता चौधरी (२३) आणि क्रितीक कोच (२३) अशी मृतांची नावे आहेत. तिघांचेही मृतदेह विच्छेदनासाठी जे.जे. रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. या प्रकरणी यलोगेट पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
- मास्टर एमडी दौड इब्राहीम कुरी (५०) यांच्यासह शर्मासन मंडल आणि गणेश बाहिया यांच्यावर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.