महापालिकेचे तीन वरिष्ठ अधिकारी गजाआड
By admin | Published: October 21, 2014 03:38 AM2014-10-21T03:38:16+5:302014-10-21T03:38:16+5:30
बांधकाम व्यावसायिकाकडून १५ लाखांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी) मुंबई महापालिकेतील इमारत प्रस्ताव विभागाच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एकूण पाच जणांना गजाआड केले.
मुंबई : बांधकाम व्यावसायिकाकडून १५ लाखांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी) मुंबई महापालिकेतील इमारत प्रस्ताव विभागाच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एकूण पाच जणांना गजाआड केले.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार या व्यावसायिकाला आयओडी (इंटीमेशन आॅफ डीसअॅप्रुव्हल) प्रमाणपत्राची आवश्यकता होती. त्यासाठी ते पालिकेच्या ई विभाग कार्यालयातील इमारत प्रस्ताव विभागात आले. तेथे त्यांची भेट कार्यकारी अभियंता सुनील राठोड, दुय्यम अभियंता बालाजी बिराजदार आणि सहाय्यक अभियंता विलास खिलारे यांच्यासोबत झाली. आयओडीसाठी या तिघांनी व्यावसायिकाकडे तब्बल २५ लाख रूपयांची लाच मागितली.
या व्यावसायिकाने एसीबीकडे तिघांविरोधात तक्रार दिली. एसीबीने तक्रारीतली तत्थता जाणून घेत तात्काळ गुन्हा नोंदवला. काल ई विभाग कार्यालयात सापळा रचण्यात आला.
तेव्हा या राठोड, खिलारे आणि बिराजदार यांच्यावतीने वास्तुरचनाकार सतीश पालव, नारायण पाटील या दोघांनी व्यावसायिकाकडून १५ लाख रूपये घेतले. तेव्हा दबा धरून बसलेल्या एसीबी अधिकाऱ्यांनी या दोघांना रंगेहाथ पकडले. त्या नंतर पालिका अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. (प्रतिनिधी)