तीन भावंडांना जलसमाधी; माता बालंबाल बचावली
By admin | Published: October 9, 2016 01:51 PM2016-10-09T13:51:45+5:302016-10-09T13:51:45+5:30
जिल्ह्यात चोवीस तासात दोन वेगवगळ्या घटनांत कपडे धुताना पाण्यात बुडून चौघांचा मृत्यू झाला. तालुक्यातील कामखेडा तीन भावंडांना जलसमाधी मिळाली.
ऑनलाइन लोकमत
बीड, दि. ९ : जिल्ह्यात चोवीस तासात दोन वेगवगळ्या घटनांत कपडे धुताना पाण्यात बुडून चौघांचा मृत्यू झाला. तालुक्यातील कामखेडा तीन भावंडांना जलसमाधी मिळाली. गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे या मुलांची आई बालंबाल बाचवली. अंबाजोगाई तालुक्यात एका महिलेचा बुडून मृत्यू झाला.
शेख जिशान शेख इसाक (१५), शेख सानिया शेख इसाक (१३), शेख अफ्फान शेख इसाक (११ रा. कामखेडा ता. बीड) अशी मयत भावंडांची नावे आहेत. ते आई परवीन शेख यांच्यासोबत रविवारी सकाळी दहा वाजता गावाजवळील बंधाऱ्यावर कपडे धुण्याकरता गेले होते. बंधारा भरुन वाहिल्याने काठोकाठ पाणी साचलेले होते. कपडे धुताना शेख जिशानचा पाय घसरला व तो पाण्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी बहीण सानिया पुढे झाली. ती देखील पाण्यात पडली. त्या दोघांनाही वाचविण्याकरता अफ्फान पाण्यात उतरला. एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात तिघेही बुडू लागले.
एवढ्यात तेथून एक महिला शेतात जात होती. तिने तीन मुले बुडत असल्याची माहिती मोबाईलवरुन गावात कळविली. यावेळी परवीनने तिन्ही मुलांना वाचिण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र त्या देखील बुडू लागल्या. तोवर गावातील तरुण तेथे पोहोचले होते. शेकडो तरुणांनी शर्थीचे प्रयत्न करुन शेख जिशान, शेख सानिया यांच्यासह माता परवीन यांना पाण्याबाहेर काढले. जिशान व सानिया यांच्या नाका- तोंडात पाणी गेल्याने त अत्यवस्थ होते. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले;परंतु त्या दोघांनाही डॉक्टरांनी मयत घोषित केले. शेख अफ्फान हा तळाला गेला होता. त्यामुळे त्याला पाण्याबाहेर काढण्यास विलंब लागला. अर्ध्या तासानंतर त्याचे प्रेत तरुणांनी बाहेर काढले.
शेख इसाक हे शेती करतात. कापूस खरेदी-विक्रीचाही त्यांचा व्यवसाय आहे. त्यांची तिन्ही मुले पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडल्याने त्यांना धक्का बसला आहे. शेख इसाक व शेख परवीन या दाम्पत्यावर उपचार सुरु आहेत.
नातेवाईकांचा टाहो
एकाचवेळी तीन भावंडांचा बुडून मृत्यू झाल्याने नातेवाईकांची जिल्हा रुग्णालयात गर्दी झाली होती. सामाजिक कार्यकर्त्यांनीही नातेवाईकांची भेट घेऊन सांत्वन केले. अश्रू व हुंदक्यांनी रुग्णालय परिसर सून्न झाला होता. गावावरही शोककळा पसरली आहे.
जिल्हा रुग्णालयात गोंधळ
तीन मुलांच्या मृत्यूनंतरही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे फिरकलेही नाहीत. या हलगर्जीबद्दल नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यामुळे सुरुवातीला तिन्ही मृतदेह ताब्यात घेणार नाहीत, असा पावित्रा नातेवाईकांनी घेतला. मात्र, सामाजिक कार्यकर्त्यांच्या मध्यस्तीने तणाव निवळला. यावेळी पोलीस बंदोबस्तही तैनात होता.
अंबाजोगाई तालुक्यात महिलेचा मृत्यू
धायगुडा पिंपळा (ता. अंबाजोगाई) येथे धुणे धुण्यासाठी तळ्यावर गेलेल्या महिलेचा रविवारी सकाळी ९ वाजता पाय घसरुन पडल्याने बुडून मृत्यू झाला. शांताबाई धर्मराज धायगुडे (४५) असे मयत महिलेचे नाव आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे