‘इसिस’कडे जाणारे तीन विद्यार्थी जेरबंद

By Admin | Published: December 27, 2015 02:52 AM2015-12-27T02:52:25+5:302015-12-27T02:52:25+5:30

इस्लामिक स्टेट आॅफ इराक अ‍ॅण्ड सीरिया (इसिस) या खतरनाक दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेल्या हैदराबादच्या तीन युवकांना येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी पहाटे

Three students going to Isis | ‘इसिस’कडे जाणारे तीन विद्यार्थी जेरबंद

‘इसिस’कडे जाणारे तीन विद्यार्थी जेरबंद

googlenewsNext

- नरेश डोंगरे, नागपूर

इस्लामिक स्टेट आॅफ इराक अ‍ॅण्ड सीरिया (इसिस) या खतरनाक दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेल्या हैदराबादच्या तीन युवकांना येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी पहाटे ताब्यात घेण्यात आले. अब्दुल बासित मोहम्मद आरिफ (वय २१, रा. नसिबनगर, हैदराबाद), सय्यद ओमर फारूख हुसेन (२२, गुलशन इक्बाल कॉलनी, हैदराबाद) आणि माज हसन फारूख (२१, मुस्कान हयात हुमायुनगर) अशी त्यांची नावे असून, हे तिघेही उच्चशिक्षित तसेच सधन परिवारातील आहेत. दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) स्थानिक अधिकाऱ्यांनी आणि हैदराबाद काउंटर इंटेलिजन्स टीम(सीआयटी)ने ही संयुक्त कारवाई केली. प्राथमिक चौकशीनंतर त्यांना सीआयटीचे अधिकारी हैदराबादला घेऊन गेले.
हे तिघे गेल्या अनेक महिन्यांपासून इसिसच्या आॅनलाइन संपर्कात होते. पालकांना आणि पोलिसांनाही त्यांची माहिती होती. त्यामुळे त्यांच्या हालचालीवर तेलंगण सुरक्षा यंत्रणेची नजर होती. हे तिघे बुधवारी घरून अचानक बेपत्ता झाले. त्यांचे मोबाइलही ‘आऊट आॅफ कव्हरेज’ असल्यामुळे पोलीस आणि सीआयटी सक्रिय झाली. तिघांच्या पालकांनी चंद्रयाण गुप्तनगर आणि हुमायुनगर पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीवरून देशभरातील सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले. ते शुक्रवारी दुपारी नागपूरकडे जात असल्याचा आणि नागपुरातून सीरियात जाणार असल्याचा अंदाज आल्यामुळे स्थानिक एटीएसला या तिघांची सचित्र माहिती देण्यात आली.
त्यानुसार, त्यांना पकडण्यासाठी शुक्रवारी रात्रीपासूनच नागपुरात आॅपरेशन सुरू करण्यात आले. एकीकडे हॉटेल, लॉज तपासणे सुरू झाले, दुसरीकडे शुक्रवारी मध्यरात्रीपासून एटीएसच्या स्थानिक पथकाने विमानतळावर सापळा लावला.
आज पहाटे ३ च्या सुमारास हे तिघेही विमानतळावर पोहोचले. त्यांच्या काही वेळेपूर्वीच पीआय भास्कर यांच्या नेतृत्वात सीआयटी हैदराबादचे पथक नागपूर विमानतळावर दाखल झाले होते. विमानतळाच्या प्रवेशद्वारावर पोहोचलेल्या बासित, ओमर आणि माजवर सीआयटीच्या अधिकाऱ्यांनी नजर रोखत एटीएसच्या अधिकाऱ्यांना इशारा करताच, त्यांच्यावर झडप घालण्यात आली. या तिघांना जेरबंद करून त्यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली. त्यात कपडे, सुकामेवा, पासपोर्ट आणि ९० हजार रुपये आढळले.
या तिघांना जेरबंद केल्यानंतर विमानतळावरून एटीएसच्या कार्यालयात आणण्यात आले. येथे त्यांची तब्बल चार तास चौकशी करण्यात आली. त्यांच्याकडून विविध प्रकारची माहिती घेतल्यानंतर, सीआयटीचे पथक त्यांना हैदराबादकडे घेऊन गेले.

...तरीही डोक्यातील ‘भूत’ कायम
- सधन परिवारातील हे तिघेही उच्चशिक्षित आहेत. बासित बीटेक फायनलचा, ओमर बीएस्सी मायक्रोलॉजी (फायनल) तर माज बीईचा विद्यार्थी आहे.
- बासित आणि माज तसेच त्यांचे दोन साथीदार असे चौघे चार महिन्यांपूर्वीच सीरियात जाणार होते. प. बंगाल, पाकिस्तानमार्गे ते सीरियात जाण्याच्या तयारीत असताना कोलकाता विमानतळावर त्यांना पकडण्यात आले होते.
- घरवापसीनंतर हैदराबाद सीआयटीने त्यांचे समुपदेशन केले. चारपैकी दोघे मागे फिरले. मात्र, बासित व फारुख यांच्या डोक्यातून इसिसचे भूत काही उतरले नाही. त्यांनी ‘त्या दोघां’चा नाद सोडून ओमरला ‘मिशन इसिस‘मध्ये सहभागी करून घेतले. त्यानंतर घरच्यांना गुंगारा देऊन गुरुवारी सायंकाळी गायब झाले.

आॅनलाइन शोध
या तिघांचा शोध घेताना सुरक्षा यंत्रणांनी त्यांचे मोबाइल, फेसबुक, ई-मेल, व्हॉटस् अ‍ॅप तपासणे सुरू केले. या तिघांचेही मोबाइल स्वीच्ड आॅफ होते. मात्र, मोबाइल आॅफ करताना त्यांनी नागपूर विमानतळावरून विमानाची श्रीनगरपर्यंतची ३ तिकिटे बुक केल्याचे उघड झाले. ते नागपूरहून इंडिगोच्या विमानाने इंदोर, दिल्लीमार्गे श्रीनगरला जाणार होते. सकाळी ८.१५ला हे विमान नागपूर विमानतळावरून इंदोरकडे झेपावते. त्यासाठी ते पहाटे ३च्या सुमारास विमानतळावर आले.

आॅनलाइन प्रभाव
कोलकाता येथून पकडून आणल्यानंतर बासित आणि माज या दोघांचे नातेवाईक, डॉक्टर, पोलीस अधिकारी आणि काही समाजसेवक समुपदेशन करीत होते. मात्र, ते इसिसच्या पुरत्या प्रभावात गेले होते. ते तासन्तास इसिसच्या आॅनलाइन प्रपोगंडा वॉरच्या संपर्कात राहायचे. ते पालकांच्याही लक्षात आले होते. पालकही त्रस्त होते. ते कोणत्याही क्षणी पळून जाऊ शकतात, असा संशय असल्यामुळे त्यांचे पालक अन् सीआयटी त्यांच्यावर सूक्ष्म नजर ठेवून होती. याच पार्श्वभूमीवर, गुरुवारी ते गायब होताच घरच्यांनी पोलिसांनी कळविले. हैदराबादमधील पोलीस ठाण्यात त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार दिली.

Web Title: Three students going to Isis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.