तीन चिन्हे सुचविलेली, निवडणूक आयोगाने वेगळेच चिन्ह दिले; शरद पवार गटाचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 01:35 PM2024-02-23T13:35:13+5:302024-02-23T13:42:03+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर शरद पवार गटाने तीन चिन्हांचा प्रस्ताव निवडणूक आयोगाला दिला होता. परंतु, आयोगाने ही तिन्ही चिन्हे नाकारल्याचे समोर आले आहे.
राष्ट्रवादी पक्ष आणि निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला दिल्यानंतर शरद पवार गटाला वेगळे नाव देण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असे पक्षाचे नाव असून चिन्हासाठी पवार गटाने अर्ज केला नव्हता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर शरद पवार गटाने तीन चिन्हांचा प्रस्ताव निवडणूक आयोगाला दिला होता. परंतु, आयोगाने ही तिन्ही चिन्हे नाकारल्याचे समोर आले आहे.
निवडणूक आयोगाला शरद पवार गटाने तीन चिन्हे सुचविली होती. त्यातले त्यात शरद पवार वटवृक्ष चिन्हासाठी आग्रही होते. परंतु आयोगाने शरद पवार गटाला म्हणजे त्यांच्या नव्या पक्षाला ‘तुतारी फुंकणारा माणूस’ हे चिन्ह दिले आहे. हे चिन्ह शरद पवार गटाने सुचविलेले नव्हते असा दावा माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
निवडणूक आयोगाकडे आम्ही ज्या तीन निशाणी सुचविल्या होत्या. त्यातील चिन्ह न देता आम्हाला त्यांनी "तुतारी" हे चिन्ह दिले, असे असे आव्हाड ट्विटद्वारे म्हणाले आहेत. यावर आव्हाड यांनी टीका केलेली नसून सकारात्मक मत मांडले आहे. निवडणूक आयोगाचे आभार मानतो. कारण, त्यांनी सांकेतिक भाषेत 'तुम्ही युद्धाला उभे रहा आणि जिंका' असाच संदेश शरद पवार नावाच्या योद्ध्याला आणि त्यांच्या सैनिकांना "तुतारी" हे चिन्ह देऊन दिला आहे, असे आव्हाड म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट झालीच नसल्याचा दावा करत शरद पवार गटाचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करण्यास अजित पवार गटाने केलेल्या विरोधावर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र आक्षेप घेतला. तसेच तीन आठवड्यानंतर मार्च महिन्यात होणाऱ्या पुढील सुनावणीपर्यंत 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार' हे नाव कायम राहील, असे स्पष्ट करत, शरद पवार गटाला एका आठवड्यात पक्षाचे चिन्ह बहाल करावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले होते.