नाशिकमधून पळालेले तिघे ठाण्यात

By admin | Published: June 8, 2016 05:02 AM2016-06-08T05:02:18+5:302016-06-08T05:02:18+5:30

घरात काम करावे लागते, अभ्यासाचाही ताण आणि आई-वडील रागावल्याने नाशिकमधून तीन अल्पवयीन मुलांनी घरातून पळून ठाणे गाठले

Three of them fled from Nashik in Thane | नाशिकमधून पळालेले तिघे ठाण्यात

नाशिकमधून पळालेले तिघे ठाण्यात

Next


ठाणे : घरात काम करावे लागते, अभ्यासाचाही ताण आणि आई-वडील रागावल्याने नाशिकमधून तीन अल्पवयीन मुलांनी घरातून पळून ठाणे गाठले... ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर पडल्यानंतर त्यांनी अपहरणाचा बनाव केला. चौकशीत त्यांची बनवाबनवी उघड झाली. पुढील अनर्थ टाळण्यासाठी या तिघांनाही वाहतुक नियंत्रण शाखेच्या पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी त्यांच्या पालकांना पाचारण करून त्यांच्या स्वाधीन केले. अवघ्या २४ तासांतच आपली मुले सुखरुप मिळाल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले.
निखिल पितांबर जाधव (१४), विशाल पितांबर जाधव (१५) हे दोघे भाऊ आणि त्यांचा मित्र कुणाल विश्वनाथ साबळे (१२) अशी ही मुले आहेत. तिघेही नाशिकच्या पवार संकुल भागातील रहिवासी आहेत. त्यांचे आई वडील मोलमजुरीचे काम करतात. घरातील काम आणि अभ्यासावर होणारी कटकट नको म्हणून विशालने पळून जाण्याची कल्पना निखिल आणि कुणाल यांना सांगितली. मुंबईत फिरु. नंतर बघू कुठे जायचे ते.... अशी चर्चा करीत ते तिघेही ६ जूनला सकाळी दहाच्या सुमारास घराबाहेर पडले. रेल्वेने इगतपुरीला आले. तिथून एका पीसीओवरुन त्यांनी घरी फोन केला... पण बोलले काहीच नाहीत. नंतर पुन्हा रेल्वेने ठाणे गाठले. सायंकाळी ७.३० वा. च्या सुमारास ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर भेदरलेल्या अवस्थेत ही मुले ठाणे नगर वाहतूक उपशाखेचे हवालदार एस. एन. चौधरी यांच्या निदर्शनास आली. ‘नाशिकच्या सातपूर भागातून गुुंगीचे औषध देऊन तोंडावर रुमाल टाकून कारमधून आम्हाला पळवून आणले आहे,’ असा कांगावा करीत त्यांच्याकडे त्यांनी मदतीची याचनाही केली. ही गाडी जवळच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळयाजवळ असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यातील एका मुलासह चौधरी तसेच नाईक आहेर यांनी नियंत्रण कक्षाला माहिती देऊन या कथित गाडीचा शोध घेतला. तशी गाडी तिथे मिळाली नाही. नियंत्रण कक्षातील संदेश बिनतारी संदेश यंत्रणेवर ऐकून उपायुक्त करंदीकर यांनीही ठाणे नगरच्या वाहतूक चौकीत धाव घेतली. त्यांच्यासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक चौधरी यांनी या मुलांकडे चौकशी करुन त्यांच्या पालकांची माहिती घेतली. आपली मुले सुखरुप असल्याची माहिती मिळताच विशालचे वडील पितांबर जाधव आणि कुणालचे काका नितिन शिरसाठ हे सोमवारी रात्री ११ वाजता ठाण्यात आल्यानंतर या तिघांनाही त्यांच्या ताब्यात देण्यात आले.
घरातून पळून आल्यावर ठाण्यात येईपर्यंत रात्र झाली. त्यात घरच्यांची आठवण येऊ लागली. कोणालाही न सांगता घराबाहेर पडल्यामुळे आई-वडील रागावण्याच्या भीतीमुळे अपहरणाचा बनाव केल्याचे कुणाल साबळे याने ‘लोकमत’ ला सांगितले. ठाणे नगर पोलिसांनीही या प्रकरणी पालक, मुलांचा जबाब नोंदविला.
>वाहतूक पोलिसांचा सत्कार
हे संवेदनशील प्रकरण अतिशय जबाबदारीने हाताळून मुलांची माहिती नियंत्रण कक्षाकडे देत त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या हवालदार एस. एन. चौधरी आणि निरीक्षक दीपक चौधरी यांचा उपायुक्त करंदीकर यांनी विशेष सत्कार केला.
>५० रुपयांमध्ये ठाण्यात
घराबाहेर पडण्याचा निर्णय घेणाऱ्या विशालकडे खाऊचे ५० रुपये होते. उर्वरित दोघांकडे पैसेही नव्हते. काही ठिकाणी लिफ्ट मागत तर काही ठिकाणी रेल्वेने प्रवास करीत त्यांनी ठाणे गाठल्याचे पोलिसांना सांगितले.
क्षुल्लक कारणावरुन सोमवारी मुलांनी घर सोडले. ठाणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुले सुखरुप मिळाल्याचा प्रचंड आनंद आहे.
- पितांबर जाधव
(निखील आणि विशालचे वडील)

Web Title: Three of them fled from Nashik in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.