तीन हजारांत भारतात ‘एन्ट्री’
By admin | Published: October 24, 2015 03:19 AM2015-10-24T03:19:45+5:302015-10-24T03:19:45+5:30
बांगलादेशी नागरिकांना अवघ्या तीन हजार रुपयांत सीमेवरून भारतात ‘एन्ट्री’ दिली जात असल्याची कबुली दोन बांगलादेशी संशयित आरोपींनी पुसद पोलिसांपुढे दिली आहे.
- प्रकाश लामणे, पुसद (यवतमाळ)
बांगलादेशी नागरिकांना अवघ्या तीन हजार रुपयांत सीमेवरून भारतात ‘एन्ट्री’ दिली जात असल्याची कबुली दोन बांगलादेशी संशयित आरोपींनी पुसद पोलिसांपुढे दिली आहे.
बनावट कागदपत्रांच्या तपासणीसाठी पुसद ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी मुंबईच्या कारागृहातून मोहम्मद आझीम गाझी माजेद गाझी (२७) व हबीब ऊर्फ हबील रूबल शेख (२५) या संशयित आरोपींना ताब्यात घेतले. पुसदच्या न्यायालयाने त्यांना २५ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांनी पोलिसांना सांगितले की, बांगलादेशच्या नडाईल जिल्ह्यातील रघुनाथपूर तालुक्याच्या कालिया येथील ते रहिवासी आहेत. त्यांनी तेथील ‘नुस्लम’ नामक एजंटाला प्रत्येकी तीन हजार रुपये दिले. त्याच्या माध्यमातून भारतीय सीमेपर्यंत व तेथून हावडा एक्स्प्रेसने मुंबईपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था केली गेली.
दीड वर्षांपूर्वी हबीबचे वडील रूबल शेख (५०) यांनीसुद्धा भारतात घुसखोरी केली. त्यांनी भंगाराचा व्यवसाय सुरू केला. मोहम्मद आझीम व हबीब हे दोघे आठ महिन्यांपूर्वी भारतात घुसले. नवी मुंबई परिसरातील वडिलांच्या भंगार व्यवसायाला हातभार लावणे सुरू केले. दोन महिने हा व्यवसाय सुरळीत चालला. मात्र विनापरवाना भारतात घुसखोरी केल्याच्या आरोपावरून मुंबई पोलिसांनी आझीम व हबीब या दोघांना अटक केली. ठाणे न्यायालयाने त्यांना सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली.
हे दोघे कारागृहात असताना सलीम नावाच्या दलालाच्या माध्यमातून हबीबच्या वडिलांकडे मुंबईतील एक वकील आला. कारागृहात असलेल्या दोघांचेही भारतीयत्व सिद्ध करण्यासाठी बनावट कागदपत्रे बनवून देण्याची तयारी त्याने दर्शविली. मात्र त्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली. भारतीयत्वही मिळते आणि कारागृहातून सुटकाही होते, म्हणून रूबल शेख यांनी एक लाख रुपये दिले. त्या वकिलानेच पुसद तालुक्याच्या (यवतमाळ) वेणी (खुर्द) येथील महा ई-सेवा केंद्रातून बनावट कागदपत्रे तयार केली. हा प्रकार उघडकीस आल्याने पुसद पोलिसांनी याच गुन्ह्यात मो. आझीम व हबीब या यांना अटक केली आहे.
केवळ अडीचशे किलोमीटरचे अंतर
बांगलादेशातील बेनातल व भारतातील अंबासा (त्रिपुरा राज्य) ही बांगला-भारत सीमा आहे. रघुनाथपूरपासून या सीमेचे अंतर २५० किलोमीटर आहे. अशाच पद्धतीने दीड वर्षांपूर्वी हबीबचे वडील रूबल शेख (५०) यांनीसुद्धा भारतात घुसखोरी केली. त्यांनी आपली बनावट कागदपत्रे मुंबईतच तयार केली असून ते आता ‘भारतीय नागरिक’ बनले आहेत. त्यांनी मुंबईतच भंगाराचा व्यवसाय सुरू केला, अशी माहिती त्यांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
दोन महिने हा व्यवसाय सुरळीत चालला. मात्र विनापरवाना भारतात घुसखोरी केल्याच्या आरोपावरून मुंबई पोलिसांनी आझीम व हबीब या दोघांना अटक केली. ठाणे न्यायालयाने त्यांना सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली. याप्रकरणी वकील आणि रूबल शेख हे पोलिसांना हुलकावण्या देत आहेत.