तीन हजार जेनेरिक दुकाने
By Admin | Published: March 1, 2016 03:25 AM2016-03-01T03:25:29+5:302016-03-01T03:25:29+5:30
संसर्गजन्य आजारांबरोबर सध्याच्या जीवनशैलीमुळे बळावणाऱ्या असंसर्गजन्य आजारांमध्ये वाढ होत आहे. २०१६ -१७ च्या अर्थसंकल्पात प्रत्येक जिल्ह्यांत सार्वजनिक-खासगी भागीदारी
मुंबई : संसर्गजन्य आजारांबरोबर सध्याच्या जीवनशैलीमुळे बळावणाऱ्या असंसर्गजन्य आजारांमध्ये वाढ होत आहे. २०१६ -१७ च्या अर्थसंकल्पात प्रत्येक जिल्ह्यांत सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर डायलिसिस केंद्र सुरू करणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली आहे. त्याचबरोबर, देशभरात रुग्णांना स्वस्तात औषधे मिळावित, म्हणून देशभरात ३ हजार जेनरिक औषधांची दुकाने सुरू करण्यात येणार आहेत. शिक्षण आणि आरोग्यासाठी एकत्रितरीत्या १ लाख ५१ हजार ५८१ कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केल्याचे जेटली यांनी स्पष्ट केले. जीवनशैलीमुळे होणाऱ्या मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग, हृदयविकार, स्ट्रोक या आजारांची चर्चा होते. आर्थिक तरतुदी केल्या जातात, पण पहिल्यांदाच अर्थसंकल्पात मूत्रपिंडाचा आजार असणाऱ्या रुग्णांना दिलासा मिळेल, अशी घोषणा केली असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. २०१६-१७ चा अर्थसंकल्प ९ मुद्द्यांवर मांडला असल्याचे अर्थमंत्री जेटली यांनी स्पष्ट केले होते. त्यातील तिसरा मुद्दा हा आरोग्य क्षेत्र, विमा हा होता, पण अर्थसंकल्प मांडताना आरोग्य क्षेत्रातील कमी मुद्दे मांडले. डायलिसिससाठी एका रुग्णाला वर्षभरासाठी येणारा खर्च हा जवळपास २ लाख रुपये इतका आहे. अशा रुग्णांना दिलासा देण्यासाठी जेटली यांनी ‘राष्ट्रीय डायलिसिस सेवा कार्यक्रमा’ची घोषणा केली आहे. राष्ट्रीय आरोग्य योजनेंतर्गत हा कार्यक्रम आहे. यात प्रत्येक जिल्ह्यात डायलिसिस केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. डायलिसिससाठी वापरण्यात येणाऱ्या डायलाझरसाठी २८ टक्के आयात शुल्क आकारण्यात येते. नक्की कोणते आयात शुल्क कमी होणार, हे स्पष्ट होणे गरजेचे असल्याचे अॅपेक्स किडनी सेंटरचे नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. राजेश कुमार यांनी सांगितले.