तीन हजार क्विंटल गव्हासह मैद्याचा साठा जप्त!
By admin | Published: May 4, 2015 01:46 AM2015-05-04T01:46:05+5:302015-05-04T01:46:05+5:30
गोरगरीब जनतेसाठी शासनाच्या स्वस्त व रास्तभाव दुकानावरील गव्हासह रवा व मैदा काळ्याबाजारात विकण्यासाठी भिवंडीतील पडघा येथील एका मिलमध्ये साठविण्यात आला होता.
सुरेश लोखंडे, ठाणे
गोरगरीब जनतेसाठी शासनाच्या स्वस्त व रास्तभाव दुकानावरील गव्हासह रवा व मैदा काळ्याबाजारात विकण्यासाठी भिवंडीतील पडघा येथील एका मिलमध्ये साठविण्यात आला होता. याची माहिती मिळताच टाकलेल्या धाडीत दोन हजार ९८१ क्विंटल गव्हासह रवा व मैद्याचा साठा पुरवठा अधिकाऱ्याच्या पथकाने जप्त केला. याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
यामध्ये शिधावाटप दुकानांवरील सुमारे ६५० क्विंटलसह फूड कॉर्पोरेशन आॅफ इंडिया (एफसीआय) चा मार्क असलेल्या सुमारे दोन हजार ३१ क्विंटल आदीसह २९८१ क्विंटल गहू, रवा, मैदा भिवंडीजवळील मिलमध्ये आढळून आला. दोन रुपये किलो गहू व तीन रुपये दराने तांदूळ रास्तभाव दुकानांवर गोरगरीब जनतेला पुरविण्यात येत आहे. पण, गरिबांच्या या धान्यावर डोळा ठेवून काळ्याबाजारासह खुल्या बाजारात विकण्याचा प्रकारच यातून उघडकीस आला.
जप्त करण्यात आलेला हा धान्यसाठा कोणत्या शिधावाटप दुकानातील आहे, याचा शोध ठाणे जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा अधिकाऱ्यांचे पथक घेत असल्यामुळे दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत.
सुमारे ७१ लाख ९९ हजार रुपये किमतीचा हा धान्यसाठा जप्त करण्यात आला आहे. रास्तभावाने या गव्हाचा पुरवठा शासनाकडून दारिद्रयरेषेखालील कुटुंबे (बीपीएल), अंत्योदय योजनेचे लाभार्थी आणि दारिद्रयरेषेवरील (एपीएल) काही कुटुंबांना होत आहे. रास्तभावाचा गहू भिवंडीजवळील गोडाऊनमध्ये साठविण्यात आल्याची खबर पुरवठा विभागाला काही दिवसांपूर्वी मिळाली होती. खबर पक्की असल्याची खात्री करून घेतल्यानंतर आरोपींचा शोध घेण्यात आला. त्यापैकी एकाला विश्वासात घेत अधिकाऱ्यांनी धाड टाकून रविवारी गुन्हा दाखल केला.