शनिवार-रविवार दुपारी तीननंतर भुशी धरणाकडे वाहनांना प्रवेश बंदी
By Admin | Published: July 5, 2017 04:27 PM2017-07-05T16:27:31+5:302017-07-05T16:36:01+5:30
वलवण व खंडाळा येथील एंट्री पाँईट पासून अवजड वाहनांना सकाळी सहा ते रात्री बारा दरम्यान लोणावळा शहरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. 5 - भुशी धरण, लायन्स पाँईट, सहारा पुल धबधबा परिसरात होणारी वाहतुक कोंडी व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी दर शनिवार व रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी दुपारी तीन नंतर भुशी धरणाकडे जाणार्या वाहनांना प्रवेश बंदी केली आहे. तसेच वलवण व खंडाळा येथील एंट्री पाँईट पासून अवजड वाहनांना सकाळी सहा ते रात्री बारा दरम्यान लोणावळा शहरात प्रवेश बंदी करण्यात आली असल्याची माहिती लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव हे उपस्थित होते.
शिवथरे म्हणाले शनिवार व रविवार तसेच इतर सुट्टयांच्या काळात होणारी वाहतुक कोंडी व पर्यटकांची गर्दी टाळण्यासाठी काही पर्यायी मार्ग, वाहनतळे तयार करण्यात आली आहे. वलवण ते खंडाळा व कुमार चौक ते भुशी धरणापर्यतचा मार्ग सिसीटिव्हीच्या कक्षेत आणला आहे. पर्यटकांच्या सुरक्षेकरिता व पावसाळी सिझन बंदोबस्ताकरिता 47 पोलीस अधिकारी, 231 पोलीस कर्मचारी, 63 महिला पोलीस, एक स्ट्रायकिंग फोर्सची मागणी करण्यात आली आहे.
आणखी वाचा
12 सेक्टर तयार करुन सिझन बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले असून यापैकी 8 सेक्टर लोणावळा शहरातील भुशी धरण, वलवण, तुंगार्ली व लोणावळा धरण, राजमाची पाँईट, कुमार चौक, सहारा पुल, रायवुड काँर्नर भागासाठी व चार सेक्टर लोणावळा ग्रामीण परिसरातील कार्ला व भाजे लेणी, लोहगड, विसापुर, तुंग व तिकोणा किल्ला, पवना धरण परिसरासाठी नियुक्त करण्यात येणार आहे.
रायवुड काँर्नर, जकात नाका, कुमार चौक येथे नाकाबंदी व चेकिंग पाँईट नेमत ब्रिथ अँनालायझर मशिनच्या सहाय्याने चालकांची तपासणी, रस्त्यावर वाहने उभी करुन साउंड सिस्टिमच्या आवाजात धिंगाणा घालणार्यांवर कारवाई, छेडछाड पथकाद्वारे महिलांची छेड काढणार्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. भुशी धरण व लायन्स पाँईट परिसरात वाहतुक कोंडीमुळे सायंकाळच्या सत्रात पर्यटक तासनतास वाहतूक कोंडीत आडकून पडतात याकरिता सायंकाळी पाचनंतर धरण परिसरातून पर्यटकांना बाहेर काढण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी दिली.