पुण्यात तीन महिला बेपत्ता
By Admin | Published: December 2, 2014 02:48 AM2014-12-02T02:48:00+5:302014-12-02T02:48:00+5:30
येथील मंगला इंगळे यांच्यासह तीन महिला दवाखान्यात जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तीन महिला तीन दिवसांपासून परतल्याच नाहीत.
पिंपरी : येथील मंगला इंगळे यांच्यासह तीन महिला दवाखान्यात जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तीन महिला तीन दिवसांपासून परतल्याच नाहीत.
हिंजवडी फेज दोनजवळील ओझरकरवाडीतील पॉवर हाऊस, गवारेवस्ती येथून शुक्रवारी दुपारी या महिला बेपत्ता झाल्या आहेत. या महिलांचे अपहरण झाले आहे का, याबाबतही पोलिसांकडून तपास सुरू आहे. प्रतिभा प्रकाश हजारे (२५, रा. ओझरकरवाडी, मूळ नवलिहाळ, जि. बेळगाव), मंगला सिद्धार्थ इंगळे (२६, रा. ओझरकरवाडी, मूळ वाशीम), विद्या दशरथ खाडे (२४, रा. ओझरकरवाडी, मूळ सातारा) अशी बेपत्ता महिलांची नावे आहेत, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. पी. भोसले यांनी सांगितले.
प्रतिभा या डीएलएफ कंपनीत तर विद्या खाडे या इन्फोसिसमध्ये सुरक्षारक्षक आहेत. मंगला गृहिणी आहेत. या सर्व महिला गवारेवस्तीत शेजारी राहतात. शुक्रवारी विद्या खाडे यांच्या पोटात दुखू लागल्याने प्रतिभा आणि मंगला त्यांना हिंजवडी येथील दवाखान्यामध्ये घेऊन गेल्या.
प्रतिभा यांची आठ वर्षांची मुलगी घरीच होती. त्यांचे पती प्रकाश कामावरून घरी आले असता, त्यांना प्रतिभा घरात दिसली नाही. त्यामुळे त्यांनी मुलीकडे चौकशी केली. मुलीने विद्या खाडे यांच्या पोटात दुखू लागल्याने आई तिला घेऊन दवाखान्यात गेली आहे, असे सांगितले. सायंकाळी पाचच्या सुमारास खाडे यांच्या मोबाईलवरून मंगला यांनी पती सिद्धार्थ यांना फोन केला. लवकर या, लवकर या असे त्या म्हणत होत्या. त्यानंतर त्यांचा मोबाईल फोन बंद झाला. सिद्धार्थ व प्रकाश यांनी विद्या आणि प्रतिभा यांच्या मोबाईलवर फोन लावला; परंतु त्यांचा मोबाईल बंद आहे. (प्रतिनिधी)