तीन वर्षांतील नीचांकी जलसाठा
By admin | Published: August 19, 2015 12:49 AM2015-08-19T00:49:27+5:302015-08-19T00:49:27+5:30
राज्यातील जलाशयात गेल्या तीन वर्षांतील नीचांकी पाणीसाठा असून दुष्काळाची छाया गडद झाली आहे. आगामी काळात अपेक्षित पाऊस न झाल्यास जिरायती
पुणे : राज्यातील जलाशयात गेल्या तीन वर्षांतील नीचांकी पाणीसाठा असून दुष्काळाची छाया गडद झाली आहे. आगामी काळात अपेक्षित पाऊस न झाल्यास जिरायती भागातील खरिपाच्या पेरण्या धोक्यात येण्याची शक्यता आहे.
राज्यातील छोट्या मोठ्या २ हजार ५२६ धरणांत केवळ ४७ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. आॅगस्टमध्ये मंदावत गेलेल्या पावसामुळे जलसाठ्याची टक्केवारी कमीच राहिली आहे. दोन वर्षांपूर्वी आॅगस्टमध्ये धरणांमध्ये ७५ टक्के तर गेल्या वर्षी ६१ टक्के पाणीसाठा होता. राज्य सरकारची २ हजार ५१० व १६ खासगी, अशा एकूण २,५२६ धरणांत ३७ हजार ५०७ द.ल.घ.मी. प्रकल्पीय व १७ हजार ७६५ द.ल.घ.मी. उपयुक्त पाणीसाठा आहे, असे जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
कोकणातील १५८ प्रकल्पांमधील साठ्याची तुलनेने चांगली स्थिती आहे. कोकणात ८० टक्के जलसाठा आहे. मराठवाड्यातील ८१४ प्रकल्पांत ८ टक्के, नागपूरमधील ३६६ प्रकल्पांत ६७ तर अमरावतीमधील ४५३ धरणांमध्ये ५९ टक्के पाणीसाठा आहे.