थॅलेसेमियाग्रस्त तीन वर्षांच्या बालिकेला नवजीवन
By admin | Published: June 26, 2017 02:39 AM2017-06-26T02:39:07+5:302017-06-26T02:39:07+5:30
मुंबईत जन्मलेली किनाया शाह ही तीन महिन्यांची असतानाच तिला थॅलेसेमियाचे निदान झाले होते. सातत्याने रक्त देत उपचार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत जन्मलेली किनाया शाह ही तीन महिन्यांची असतानाच तिला थॅलेसेमियाचे निदान झाले होते. सातत्याने रक्त देत उपचार केल्यानंतर तिच्या पालकांनी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल केले. या रुग्णालयात तीन वर्षांच्या किनायाला थॅलेसेमियातून बरे करण्यासाठी एरवी ‘ल्युकेमिया’साठी (रक्ताचा कर्करोग) वापरण्यात येणारी ‘हिप्लोस्टेक्टीकल बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट’ शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. तिच्या वडिलांच्या ‘स्टेम सेल’चा उपयोग यात करण्यात आला असून किनायाला आता सतत रक्त देण्याची तसेच दीर्घकाळ औषधे घेण्याची गरज उरलेली नाही. पश्चिम भारतात प्रथमच अशी उपचारपद्धती वापरण्यात आली आहे.
किनायाला थॅलेसेमियाचे निदान झाल्यावर इतकी वर्षे तिला वेल्लोर, बेंगळुरू आणि पुणे येथे सातत्याने रक्तपुरवठ्याचे उपचार केल्यानंतर तिच्या पालकांनी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयातील डॉ. सांतनू सेन यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी किनायाला बरे करण्यासाठी नवीन उपचारपद्धती वापरण्याचा निर्णय घेतला. सेन यांनी तीन महिने केमोथेरपी देत किनायाची रोगप्रतिकारकशक्ती वाढवली. त्यामुळे तिच्या शरीराला ग्राफ्ट (प्रत्यारोपण) स्वीकारण्यासाठी मदत झाली. एकसारख्या पेशी असलेला दाता शोधण्यासाठी ‘एचएलए टायपिंग’ अतिशय महत्त्वाचे असते, कारण
ते जनुकीय पातळीवर निश्चित
झालेले असतात. अशावेळी रुग्णाशी संबंधित व्यक्तींच्या पेशी जास्तीत
जास्त मिळत्याजुळत्या असतात. तीन महिने केमोथेरपी दिल्यानंतर वडिलांच्या बोन मॅरोमधून ‘स्टेम सेल’ घेतले. मात्र त्यांचे स्टेम सेल ७० टक्के जुळत असल्याचे जनुकीय चाचणीत दिसून आले.
शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणा पेशींच्या पृष्ठभागावर दिसणाऱ्या ‘एचएलए प्रोटिन्स’च्या मदतीने शरीरातील मूळ पेशी तसेच बाहेरून आलेल्या पेशी ओळखते. जनुकीय चाचणीमध्ये तिच्या वडिलांचे स्टेम सेल्स ७० टक्के समान असल्याचे दिसल्याने ट्रान्सप्लान्टसाठी तेच वापरायचे डॉक्टरांनी ठरवले. तिच्या शरीराने हे ग्राफ्ट स्वीकारले नाही, तर जोखीम नको म्हणून किनायाचे स्वत:चे स्टेम सेल्सही आधीच गोठवून ठेवण्यात आले होते. त्यानंतर किनायावर शस्त्रक्रिया झाली.
रुग्ण बरा होण्याची शक्यता वाढली-
थॅलेसेमिया आजाराचे रुग्ण बरे करण्यासाठी ‘हिप्लोस्टेक्टीकल बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट’ प्रक्रिया वापरण्यास सुरुवात केली आहे. एरवी ही प्रक्रिया ‘ल्युकेमिया’ हा आजार बरा करण्यासाठी वापरली जाते. नव्या उपचार पद्धतीमुळे लहान मुलांसाठी बरे होण्याची शक्यता अधिक वाढली असल्याचे डॉ. सेन यांनी सांगितले.