बोथाकाजीत दारुबंदीची तीन वर्ष पूर्ण

By admin | Published: June 7, 2014 11:15 PM2014-06-07T23:15:56+5:302014-06-07T23:45:54+5:30

तीन वर्षाअगोदर महिलांनी गावात दारुबंदी घडवून आणली.

Three years of full-bodied alcohol abuse | बोथाकाजीत दारुबंदीची तीन वर्ष पूर्ण

बोथाकाजीत दारुबंदीची तीन वर्ष पूर्ण

Next

खामगाव : तालुक्यातील बोथाकाजी गावात मोठय़ा प्रमाणात दारुविक्री होऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. दारूच्या व्यसनामुळे आणखी बळी जाऊन संसार रस्त्यावर येऊ नयेत म्हणून तीन वर्षाअगोदर महिलांनी गावात दारुबंदी घडवून आणली. पोलिस प्रशासन व गावकर्‍यांच्या सहकार्याने आज या घटनेला तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. खामगाव तालुक्यातील बोथाकाजी गावात अनेक वर्षांपासून अवैध दारुविक्री मोठय़ा प्रमाणात चालू होती. तेव्हा दारू पिणार्‍यांचीही संख्या चांगलीच होती. सार्वजनिक ठिकाणी मद्यपींचा धिंगाणा, अश्लील शिवीगाळ होऊन अशांतता पसरवणे चालू होते. याचा विशेष त्रास महिलांना सहन करावा लागत होता. दारू जीवनाचा घात करेल, असे कुणाच्याही ध्यानीमनी नव्हते; मात्र २0११ वर्ष हे बोथाकाजीतील युवकांसाठी कर्दनकाळ ठरले. ६ महिन्यांच्या कालावधीत गावातील पाच तरुणांचा दारूच्या नशेमुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे अपघातात नाहक बळी गेले. परिणामी त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले. हीच परिस्थिती इतरांवर येऊ नये म्हणून गावातील महिला पेटून उठल्या. जुलै २0११ मध्ये महिलांनी अवैध दारुविक्री बंदीसाठी एल्गार पुकारला व गावातून यापुढे कायमच दारू विक्री होऊ द्यायची नाही, असा निश्‍चय केला सुरुवातीला दारूविक्रेत्यांना योग्य त्या रीतीने समज देऊन दारूविक्री बंद करायला सांगितले तर ज्यांनी महिलांच्या या दारूबंदी चळवळीला विरोध केला. अशा विक्रेत्यांना पोलिसांच्या सहकार्याने धडाही शिकविला. या कामी वेळोवेळी खामगाव ग्रामीण पोलिसांचे सहकार्य मिळत गेले. गावात महिलांनी दारूबंदी समिती तयार केली. यावेळी ग्रा.पं. चे पदाधिकारी तंटामुक्त समिती तसेच गावकर्‍यांसोबत पोलिसही महिलांच्या पाठीशी उभे राहिले. महिलांनी उग्र रूप धारण करून गेल्या कित्येक वर्षांपासून गावात चालू असलेली दारूविक्री बंद केली. यावर अगोदर नागरिकांचा विश्‍वासच बसत नव्हता. कारण पोलिसांना हप्ते देऊन दारू विक्रेते केव्हाही दारूविक्री चालू शकतात, हा समज मात्र येथे मागे राहिला. तर जनतेच्या मनात पोलिसाप्रती चांगली व सुरक्षिततेची भावना कायम राहावी तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याकरिता बोथाकाजी गावात दारूबंदीला पोलिसांचाही १00 टक्के पाठिंबा असल्याचे दिसून आले आहे. महिलांनी व गावकर्‍यांनी केलेल्या संकल्पनेला आता तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. याकरिता सरपंच गणेश हिवराळे, माजी सरपंच गणेश पाटेखेडे, उपसरपंच शेख राजू, तंटामुक्त समिती अध्यक्ष अरुण हिवराळे, पोलिस पाटील विश्‍वनाथ परकाळे महिलांच्या पाठीमागे नेहमीच उभे आहेत. तर खामगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे बिट जमादार शशीकांत धारकरी नेहमीच लक्ष ठेवून आहेत. दारूबंदी समितीच्या अध्यक्ष धृपदा उपर्वट, उपाध्यक्ष शोभा हिवराळे, सचिव सुमन हिवराळे यांनी महिलांना एकत्रित करून दारूविक्रीसाठी केलेले प्रयत्न आज यशस्वी ठरले आहेत. तीन वर्षांपासून दारुविक्री बंद असून, यापुढेही कायम राहील, असा गावकर्‍यांचा निर्धार आहे. तर हा निर्धार प्रत्यक्षात उतरण्यासाठी पोलिसांची मदत जरुरी असते. त्यासाठी पोलिसांनीही दारुबंदीसाठी नेहमी दक्ष राहाणे गरजेचे आहे. याचा परिसरातील गावकर्‍यांनी आदर्श घेण्याची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Three years of full-bodied alcohol abuse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.