कारागृहात तीन वर्षांत गेले चौघींचे बळी

By Admin | Published: July 4, 2017 06:11 AM2017-07-04T06:11:53+5:302017-07-04T06:22:22+5:30

भायखळा कारागृहात मंजुळा शेट्ये हिच्या हत्येनंतर तुरुंगातील विदारक वास्तव समोर आले. याच कोंडवाड्यात गेल्या तीन वर्षांत चार महिला कैदींनी

Three years of imprisonment for three years in jail has been sacrificed | कारागृहात तीन वर्षांत गेले चौघींचे बळी

कारागृहात तीन वर्षांत गेले चौघींचे बळी

googlenewsNext

मनीषा म्हात्रे/लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भायखळा कारागृहात मंजुळा शेट्ये हिच्या हत्येनंतर तुरुंगातील विदारक वास्तव समोर आले. याच कोंडवाड्यात गेल्या तीन वर्षांत चार महिला कैदींनी अखेरचा श्वास घेतला. यापैकी तिघींचा मृत्यू हा मानसिक तणावातून झाला होता.
महाराष्ट्र तुरुंग विभागात ९ मध्यवर्ती कारागृहे, ३१ जिल्हा कारागृहे, १३ खुली कारागृहे, एक खुली वसाहत आणि १७२ उप-कारागृहे आहेत. त्यापैकी मुंबईतील भायखळा आणि पुण्यातील येरवडा कारागृहात महिलांसाठी स्वतंत्र कारागृहे आहेत. मंजुळा शेट्येच्या हत्येनंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी राज्यातील विविध कारागृहांतील महिला कैद्यांच्या स्थितीचा आढावा घेऊन त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. तसेच एकंदरीत कैद्यांच्या परिस्थितीवरून उच्च न्यायालयानेही ताशेरे ओढले. त्यांनी कारागृहाची परिस्थिती सुधारा, अन्यथा कारवाई करू, असे आदेश दिले आहेत.
पुण्यातील येरवडा कारागृहापेक्षा भायखळ्यातील चित्र भयावह आहे. भायखळा कारागृहात जेलरसह अन्य महिला कर्मचाऱ्यांकडून झालेल्या अमानुष मारहाणीत २३ जूनला वॉर्डन मंजुळा शेट्येच्या मृत्यूनंतर महिला कैद्यांचा उद्रेक झाला. या घटनेमुळे येथील महिला कैद्यांच्या समस्या प्रकाशझोतात आल्या. भायखळा कारागृहात दोनशे कैद्यांची क्षमता असताना येथे जवळपास तीनशेहून अधिक महिला कैदी कोंबण्यात आले आहेत. त्यात महिलांसोबत त्यांची लहान मुलेदेखील याच कारागृहात आहेत. कारागृहात अवघे दोन ते तीन तास येणाऱ्या पाण्यात त्यांना आंघोळ आणि अन्य विधी आवरणे गरजेचे असते. यादरम्यान एकाच वेळी सर्व महिला तुटून पडतात. त्यामुळे भांडणे होतात. पुरेसे अन्न, पाणी या सुविधांची मोठ्या प्रमाणात वानवा असते. क्षमतेपेक्षा जास्त कैद्यांमुळे त्यांच्यासह त्यांच्या मुलांवर याचा अनिष्ट परिणाम होताना दिसतो. मूल सहा वर्षांचे होईपर्यंत आईसोबत राहू शकते. त्यानंतर मूल सरकारच्या ताब्यात येते. आरोग्याच्या सुविधांपासून त्यांनाही वंचित राहावे लागते. महिला कैद्यांच्या संख्येच्या तुलनेत राहण्याची व्यवस्था, शौचालयांच्या गैरसोयीमुळे त्यांना नानाविध समस्यांना तोंड द्यावे लागते. याचा फटका त्यांना मासिक पाळीदरम्यान होतो. अनेकदा सॅनिटरी नॅपकि नही त्यांना उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी महिला कैद्यांकडून केल्या जातात. 
यातून होणारा मानसिक तणाव, आजारांमुळे महिला कैदींसाठी हीच कारागृहे मृत्यूचा सापळा ठरत असल्याचे चित्र भायखळा कारागृहात पाहावयास मिळाले. 
गेल्या तीन वर्षांत चार महिला कैद्यांचा मृत्यू झाल्याची माहिती महात्मा गांधी मानव अधिकार फोरमचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप भालेराव यांनी माहिती अधिकाराखाली मागविलेल्या माहितीमध्ये उघड झाली. ४ मार्च २०१६ला अचानक छातीत दुखू लागल्याने भावना हर्षद गिरी हिचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ ९ आॅक्टोबरला बबिता तमंग हिचाही मृत्यू झाला. 
त्यापूर्वी ६ डिसेंबर २०१४ रोजी सलताबिबी शेख हिचा उच्च रक्तदाब, मधुमेहामुळे आणि मोन्डे नावा हिचा १२ जानेवारी २०१५ रोजी क्षयरोगामुळे मृत्यू झाला. 
चौघींपैकी तिघी जणी या मानसिक तणावाखाली होत्या. यातील दोघी एका दुर्धर आजारानेही ग्रस्त असल्याची नोंद करण्यात आली आहे. 
भावना गिरीच्या मृत्यूप्रकरणी संशय व्यक्त करण्यात येत होता. माहिती अधिकारात तिच्या मृत्यूचे कारणदेखील राखीव ठेवण्यात आले होते. याबाबत भायखळा कारागृहाचे तुरुंग महानिरीक्षक राजवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्या अंगावर कुठल्याच प्रकारच्या जखमा नव्हत्या. तसेच न्यूमोनियामुळे तिचा मृत्यू झाल्याचे अंतिम अहवालात समोर आल्याचे सांगितले.

हे तर मृत्यूचे सापळे...

कारागृह प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील मध्यवर्ती कारागृहात (आर्थर रोड) २०१५ ते २०१७ या तीन वर्षांत २४ कैद्यांचा मृत्यू झाला. याच आर्थर रोड कारागृहात २००४ ते २००७ या कालावधीत तब्बल ५५ कैद्यांच्या मृत्यूची धक्कादायक नोंद झाली होती. तर ठाणे कारागृहामध्ये गेल्या तीन वर्षांमध्ये २१ कैद्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

Web Title: Three years of imprisonment for three years in jail has been sacrificed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.