औरंगाबादमध्ये तीन तरुण बुडाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2016 05:58 AM2016-11-07T05:58:24+5:302016-11-07T05:58:24+5:30
मिटमिटा येथील तलावात पोहण्यासाठी गेलेले तीन तरुण बुडाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. दोन तासांच्या प्रयत्नानंतर दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले
औरंगाबाद : मिटमिटा येथील तलावात पोहण्यासाठी गेलेले तीन तरुण बुडाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. दोन तासांच्या प्रयत्नानंतर दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. तिसऱ्या तरुणाचा उशिरापर्यंत शोध लागला नाही.
आशुतोष अनिल म्हस्के (२३), अनिकेत संजय ढवळे (२०) आणि प्रतीक हुमणे (१७) अशी या तरुणांची नावे आहेत. हे तिघेही मित्र असून आशुतोष आणि अनिकेत हे मिटमिटा परिसरातील तलावात पोहण्यासाठी उतरले. पण पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने एकापाठोपाठ हे तिघे तलावात बुडाले. बराच वेळ झाला तरी प्रतीक आणि त्याचे मित्र तलावाकडून परतले नाही म्हणून प्रतीकचा भाऊ तलावावर त्यांना पाहण्यासाठी गेला. यावेळी तलावाच्या काठाशी त्यांची दुचाकी आणि कपडे पडलेले दिसले. त्यामुळे त्याने आरडाओरड केल्याने परिसरातील शेतकरी मदतीला धावले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. (प्रतिनिधी)
दोन अभियांत्रिकीचे तर एक नर्सिंगचा विद्यार्थी
तलावात बुडालेल्यांपैकी आशुतोष म्हस्के हा शासकीय नर्सिंग महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिकत होता. प्रतीक हुमणे हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील केंद्रीय प्राद्योगिक संस्थेत माहिती व तंत्रज्ञान शाखेत प्रथम तर अनिकेत ढवळे हा अभियांत्रिकी महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिकत होता.