मुंबईतील तीन तरुण गेले इसिसच्या वाटेवर?
By admin | Published: December 22, 2015 03:16 AM2015-12-22T03:16:18+5:302015-12-22T03:16:18+5:30
दहशतवादी कारवायांनी अवघे जग त्रस्त असतानाच मुंबईतून बेपत्ता झालेले तीन तरुण दहशतवादाच्या आकर्षणातून स्थलांतरित झाले असण्याच्या शक्यतेने महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक हादरले आहे.
एटीएस हादरले : मध्य पूर्वेत गेल्याची शक्यता अद्याप धूसर
डिप्पी वांकाणी, मुंबई
दहशतवादी कारवायांनी अवघे जग त्रस्त असतानाच मुंबईतून बेपत्ता झालेले तीन तरुण दहशतवादाच्या आकर्षणातून स्थलांतरित झाले असण्याच्या शक्यतेने महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक हादरले आहे. २३ ते २६ वयोगटातील हे तरुण मुंबईतील मालवणी भागातून बेपत्ता झाले आहेत. या तिघांचा ठावठिकाणा शोधण्यास आम्ही सुरुवात केली आहे, असे एटीएसच्या वरिष्ठ सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले. या तिघांनी देश सोडल्याचा पुरावा मात्र एटीएसकडे नाही. हे तिघे इसिसच्या वाटेवर असल्याच्या शक्यतेचाही तपास पोलीस करत आहेत.
कॉल सेंटरमध्ये कामाला असलेला अयाझ सुलतान (२३) आणि आॅटोरिक्षा चालविणारा मोहसीन सय्यद (२६) व लिंबू विक्रेता वाजीद बशीर शेख (२५) हे तिघेही मालवणी भागातून बेपत्ता झाले आहेत. अयाझ हा ३० आॅक्टोबरपासून तर इतर मोहसीन व वाजीद हे दोघे १५ डिसेंबरपासून बेपत्ता आहेत. यांचा अतिरेकी कारवायांत सहभागी होण्याचा उद्देश असू शकतो, असा त्यांच्या कुटुंबीयांना संशय आहे. एकाच्या पत्नीने तिचा पती अतिरेकी संघटनेत सहभागी होण्यावर गेल्या दोन महिन्यांपासून भर देत असल्याचे सांगितल्याने एटीएसने चौकशी सुरू केली आहे. त्यांच्या बेपत्ता होण्याचा हेतू नेमका हाच होता याला आम्ही दुजोरा देऊ शकत नाही व त्यांचा ठावठिकाणाही सांगू शकत नाही, असे एटीएसमधील सूत्रांनी सांगितले.
सर्व बाजूंनी तपास सुरू
हे तिघेही देशाबाहेर गेलेले आहेत असा कोणताही पुरावा सध्या आमच्याकडे नाही. त्यांना शोधण्यासाठी आम्ही आमच्या तुकड्या कामाला लावल्या आहेत. जिहादी स्वरूपाचे कोणतेही काम करण्याचा त्यांचा हेतू होता का; हेही आम्ही तपासून बघत आहोत, असेही एटीएसच्या सूत्रांनी सांगितले.
वाजीदने त्याचे वर्तन गेल्या दोन महिन्यांपासून बदलले होते, असे त्याची पत्नी व माझी बहीण फातिमाने आम्हाला सांगितले. तिने पोलिसांना सांगितले की एखाद्याने जिहादमध्ये कसे सहभागी व्हावे यावर तो बोलायचा. नंतर नंतर त्याने त्याच्या मित्रांसोबत जास्त वेळ घालवायला सुरुवात केली.
तो घरी खूप कमी असायचा, असे फातिमाच्या भावाने सांगितले. वाजीद बेपत्ता झाल्याच्या दिवसापासून फातिमाने पतीचे घर का सोडले, असे विचारल्यानंतर तिचा भाऊ म्हणाला की, ‘‘भोवळ आल्यासारखे वाटल्यामुळे मी तिला माझ्या घणसोलीतील घरी आणले.’’
वाजीदचे वडील बशीर म्हणाले की, वाजीद १५ डिसेंबरच्या रात्री एक वाजेपर्यंत परत न आल्यामुळे आम्ही तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली. दुपारी तीनच्या सुमारास तो घरातून आधारकार्डमध्ये काही दुरुस्त्या करायच्या असल्यामुळे अधिकाऱ्याला भेटायला जातो असे सांगून गेला.
परंतु सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मला जवळच्याच विक्रेत्याचा वाजीद आला नव्हता व बीएमसीची मोठी धाड पडल्याचे सांगणारा फोन आला. आम्ही त्याच्याशी संपर्क साधण्याचा बराच प्रयत्न केला, परंतु त्याचा मोबाइल फोन घरीच होता. त्याच्या नावाने तर पासपोर्टही नाही, असेही ते म्हणाले.
घरून दुकानावर जायचा व रात्री परतायचा अशी त्याची दैनंदिनी होती, असे वाजीदच्या शेजाऱ्याने सांगितले.
मोहसिनचे वडील इब्राहिम यांनी सांगितले की त्याने सूरतमध्ये मित्राच्या लग्नाला जायचे आहे असे सांगून १५ डिसेंबर रोजी घर सोडले. तो २-३ दिवसांत येणार होता. दिवसाकाठी पाचवेळा नियमित प्रार्थना करणाऱ्या मोहसिनच्या वर्तनात कोणताही लक्षणीय बदल जाणवत नव्हता. त्याच्याकडे पासपोर्टही नव्हता.
अयाज स्वभावाने साधासरळ. तो असल्या मार्गाने जाऊ शकत नाही. कुवैतमध्ये नोकरी मिळाल्याने व्हिसाच्या कामासाठी पुण्याला जायचे म्हणून ३० आॅक्टोबर रोजी त्याने घर सोडले. काम आटोपून परत येईल, असे तो म्हणाला होता, असे त्याची बहीण शैना यांनी सांगितले.
>>>कोण हे तिघे?
वाजिद 25
धंदा : लिंबू विक्रेता शिक्षण : बी. कॉम. (दालमिया कॉलेज) : कुटुंबात सर्वात लहान. त्याला पाच बहिणी. त्या आई-वडिलांसोबत मालवणीतील एमएचबी कॉलनी गेट नंबर ८ येथे राहतात. दहा महिन्यांपूर्वीच त्याचे फातिमाशी लग्न. मूळचा कर्नाटकातील होसपेठचा.
अयाझ सुल्तान 23
धंदा : कॉल सेंटरमध्ये नोकरी
शिक्षण : एस.वाय. बी. कॉमपर्यंत, त्याचे वडील पाकिस्तानी आणि आई भारतीय आहे. चौथीपर्यंत कुवैतमध्ये शिक्षण. त्याला दोन भाऊ आणि दोन बहिणी आहेत. दीड वर्षापासून मालवणीत भाड्याच्या घरात राहतात.
मोहसिन 26
धंदा : रिक्षाचालक
शिक्षण : नववीत शाळा सोडली. त्याला चार बहिणी आणि भाऊ असून हे सर्व आई-वडिलांसोबत राहतात. त्याची पत्नी आणि दोन मुलेही त्याच्या आई-वडिलांकडे राहतात. मूळचा परभणीतील असून २००६ पासून म्हाडा कॉलनीत राहतो.