दरोडखोरांच्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
By admin | Published: April 25, 2017 10:50 AM2017-04-25T10:50:26+5:302017-04-25T10:50:26+5:30
पुण्याजवळील धामणे येथे शेतातील पडाळीवर शस्त्रांसहीत आलेल्या दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 25 - पुण्याजवळील धामणे येथे शेतातील पडाळीवर शस्त्रांसहीत आलेल्या दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत वारकरी संप्रदयातील ज्येष्ठ टाळकरी, त्यांची पत्नी आणि मुलाचा मृत्यू झाला. तर या हल्ल्यात सून गंभीर जखमी झाली असून दोन नाती सुदैवाने वाचल्या आहेत. यातील एक जण किरकोळ जखमी आहे.
या घटनेमुळे मावळ तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मावळ तालुक्यातील सोमाटणे फाट्याजवळील धामणे या गावात मंगळवार(25 एप्रिल) पहाटे ही घटना घडली. नथू विठोबा फाले (वय 65), छबाबाई नथू फाले (वय 60), अत्रीनंदन ऊर्फ आबा नथू फाले (वय 30) अशी दरोडेखोरांच्या मारहाणीत मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. या घटनेत नथू फाले यांची सून तेजश्री अत्रीनंदन फाले(वय25) ही गंभीर जखमी झाली आहे.
अंजली अत्रीनंदन फाले(वय6) ही नात किरकोळ जखमी आहे. दरोडेखोरांनी डोक्यात टिकावाचे घाव घालून तिघांची निर्घृण हत्या केली. यामुळे धामणे गाव व पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे.
नथू फाले हे मावळ तालुक्यातील ज्येष्ठ टाळकरी होते. हभप फालेमामा या नावाने ते सांप्रदायिक क्षेत्रात ओळखले जात. ते ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक होते. तालुक्यातील प्रत्येक हरिनाम सप्ताहात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. त्यांच्या कुटुंबावरील या हल्ल्याने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक मुगुट पाटील , वरीष्ठ अधिकारी,श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीस निरीक्षक मुगुट पाटील यांनी दरोड्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे.
नथू फाले यांची धामणे गावच्या शिवारात शेतात पडाळ आहे. ज्यावेळी घटना घडली तेव्हा घरात एकूण सात माणसे होती. दरोडे खोरांच्या हल्ल्यात अनुश्री व ईश्वरी या दोन्ही नाती सुदैवाने बचावल्या.
दरम्यान,धामणे गावात मंगळवारी पहाटे दोन तीन ठिकाणी घरफोडी करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती पुढे येत आहे.
(वार्ताहर)