आपत्तीच्या उंबरठय़ावर
By Admin | Published: August 7, 2014 11:42 PM2014-08-07T23:42:02+5:302014-08-08T00:21:16+5:30
अजिंठा डोंगर रांगातील गावांना धोका : डोंगरातून वाहणार्या पाण्याचीही भीती
बुलडाणा : पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर डोंगराची संपूर्ण कडाच कोसळली व हे संपूर्ण गाव गाडले गेले. या पृष्ठभूमीवर बुलडाणा शहर परिसरात डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या गावांचा आढावा घेतला असता काही गावे भविष्यात ह्यमाळीणह्णच्या वाटेवर असल्याचे समोर आले आहे. अशी गावे व शहरांमधील काही वस्त्यांवरही अशीच आपत्ती कोसळू शकते, अशी बाब या निमित्ताने समोर आली आहे.
बुलडाणा शहराला मलकापूर मार्गावर जवळपास ४ कि.मी.चा वळणदार घाट लाभला आहे. शहराच्या चारही बाजूंनी अजिंठा डोंगर आहेत. त्यामुळे शहराचा विस्तार थेट डोंगररांगांपयर्ंत झाला आहे. या डोंगराच्या पायथ्याशी खडकी, खामखेड, मोहेगाव, खैरखेड, नळकुंड, हनवतखेड, कुर्हा या गावांशिवाय बर्याच लहान-मोठय़ा लोकवस्त्या वसलेल्या आहेत.
या गावांपैकी खडकी आणि खामखेड ही गावे सर्वाधिक असुरक्षित आहेत. गावातील काही घर थेट डोंगर पायथ्यावर चढलेली आहे. त्यामुळे या घरांना भुस्खलनाचा मोठा धोका आहे. ढगफुटी अथवा अधिक पाऊस पडला तर गावातील काही भागांना धोका पोहोचण्याची शक्यता जास्त आहे. अवेळी निर्माण होणारी ही आपत्ती ग्रामस्थांसाठी धोक्याची ठरु शकते.
** खडकी बंधारा घातक
मोताळा तालुक्यात येणार्या खडकी गावाला तिन्ही बाजूला डोंगराचा वेढा आहे. गावापासून दीड किमी अंतरावर डोंगराच्या कुशीत बंधारा आहे. बंधार्यातून एका लहान नाल्याद्वारे गावात पाणी येते. याच पाण्याचा वापर करुन ग्रामस्थ शेतीमध्ये पीक घेतात. कडक उन्हाळ्यातसुद्धा हा बंधारा कोरडा झालेला नाही, हे विशेष; मात्र गतवर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे या बंधार्याने धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे नाल्याद्वारे पाणी गावात शिरले. या पाण्याचे शेतातील उभे पीक झोपवली आणि घरांचे मोठे नुकसान झाले होते.
** खामखेड डोंगराचा धोका
खामखेड गावाची लोकसंख्या हजार ते बाराशेच्या जवळपास आहे. संपूर्ण गाव बुलडाणा लगतच्या अजिंठा डोंगरपायथ्याशी वसले आहे. गावाच्या चारही बाजूला वनराईने नटलेले डोंगर आहे; मात्र जास्त पाऊस पडल्यास या डोंगराहून पाण्याचे लोंढे थेट लोकवस्ती मध्ये येतात. या पाण्याच्या लोंढय़ांमुळे उभ्या पिकांचे नुकसान होते. घरांच्या भिंतीची पडझडही होते. शिवाय डोंगरपायथ्याची माती भुसभुशीत झाल्यामुळे येथील ग्रामस्थांनाही डोंगर खचण्याची भीती सतत वाटते. यासोबतच वन्यप्राण्यांच्या हल्ल्याचे सावट खामखेडवासीयांवर कायमच असते.