एकहाती सत्ता की सत्तेसाठी गळा

By admin | Published: January 30, 2017 01:57 AM2017-01-30T01:57:38+5:302017-01-30T01:57:38+5:30

ठाण्याची महापालिका अस्तित्वात आल्यानंतरची ही सातवी निवडणूक. २५ वर्षे महापालिकेत सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेना-भाजपाची यंदा आमनेसामने झुंज आहे

The throats of the power of the monopoly power | एकहाती सत्ता की सत्तेसाठी गळा

एकहाती सत्ता की सत्तेसाठी गळा

Next

अजित मांडके, ठाणे
ठाण्याची महापालिका अस्तित्वात आल्यानंतरची ही सातवी निवडणूक. २५ वर्षे महापालिकेत सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेना-भाजपाची यंदा आमनेसामने झुंज आहे. लढतही निकराची आहे. त्यामुळे आजवर कधीही बहुमताचा आकडा गाठता न येण्याची सत्तापरंपरा यंदाही कायम राहणार की, व्यूहरचनेप्रमाणे शिवसेना एकहाती सत्ता मिळवत नवा इतिहास घडवणार, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष आहे. भाजपाने आयारामांसाठी दारे खुली केली असली, तरी त्यांच्या भरवशावर तो पक्ष किती फुगणार, याचे गणित सोडवण्याचे काम सध्या सुरू आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने सुरुवातीला आव्हान देण्याचा आव आणला होता, पण अजूनही त्या पक्षांची गळती थांबत नसल्याने एकत्र येऊनही ते कितपत आव्हान देऊ शकतील, हा प्रश्नच आहे.
२५ वर्षांचा सत्तेचा वनवास संपवण्याचा विडा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उचलला असला, तरी त्यांचे हाल कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीसारखे होणार हे नेत्यांनाही ठाऊक आहे.
ठाणे महापालिकेची मुहूर्तमेढ १९८२ मध्ये रोवली गेली. त्यानंतर, १९८६ मध्ये झालेल्या पहिल्यावहिल्या निवडणुकीत ६५ जागांपैकी ३० जागा जिंकून शिवसेनेने बाजी मारली. कॉंग्रेसनेही दुसऱ्या क्रमांकावर येत २५ जागा आपल्या खिशात टाकल्या. भाजपाला मात्र केवळ पाच जागाच मिळाल्या. शरद पवारांच्या समाजवादी कॉंग्रेसला एक जागा मिळाली होती. मात्र, सेनेला फार काळ आपली सत्ता टिकवता आली नाही. १९८७ मध्ये वसंत डावखरे यांनी राजकारणाच्या सारीपाटात असा काही डाव टाकला की, त्यामुळे भाजपाचे सदस्य फुटले आणि सेनेच्या हातून कॉंग्रेसकडे सत्ता गेली. १९९२ च्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. कॉंग्रेसने या निवडणुकीत सर्वाधिक ३५ जागा मिळवल्या. शिवसेनेला २५ जागांवर समाधान मानावे लागले. १९८६ पेक्षा शिवसेनेच्या पाच जागा कमी झाल्या. या वेळी भाजपाच्या पारड्यात १० जागा पडल्या. सत्तेची चावी १२ अपक्षांच्या हाती आली. १९९२ मध्ये १२ पैकी ९ अपक्षांनी कॉंग्रेसच्या पारड्यात मते टाकली. लगेचच १९९३ मध्ये १२ पैकी ११ अपक्षांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. त्यामुळे कॉंग्रेसला केवळ एक वर्षांचा कार्यकाळ उपभोगण्यास मिळाला. तेव्हापासून शिवसेनेने सत्ता आपल्याच ताब्यात ठेवल्याचे दिसून आले. १९९७ च्या तिसऱ्या निवडणुकीत मतदारांचा कौल स्पष्ट बहुमत देणारा नव्हता. तरीही, सर्वात मोठा पक्ष म्हणून ठाणेकरांनी पुन्हा सेनेच्याच पारड्यात मते टाकल्याचे दिसून आले. या निवडणुकीत शिवसेनेचे ३९ सदस्य निवडून आले. भाजपाच्या पारड्यात आणखी एक जागा वाढून त्यांचे संख्याबळ ११ वर गेले. कॉंग्रेसचे संख्याबळ मात्र ९ ने घटले. त्यांच्या पारड्यात २६ जागा आल्या. त्यानंतर, २००२ मध्ये पुन्हा शिवसेनेचा वरचष्मा दिसून आला. या निवडणुकीत शिवसैनिकांनी खऱ्या अर्थाने आनंद दिघे यांना श्रद्धांजली वाहिली. शिवसेनेचे संख्याबळ ४९ वर गेले. भाजपानेही संख्याबळ १४ वर नेले. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे घड्याळ प्रथमच खणखणले आणि त्यांना तब्बल २५ जागा मिळाल्या. मात्र, कॉंग्रेसचे बळ १३ वर आले.
२००७ मध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी मोठ्या ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरले. तरीही, महापालिकेवर पुन्हा भगवाच फडकला. शिवसेनेला या निवडणुकीत ४८ जागा मिळाल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेसला २५ आणि कॉंग्रेसला १६ जागा मिळाल्या. मात्र, भाजपाचे संख्याबळ १४ वरून पाचवर आले. राष्ट्रवादी वाढल्याचा धक्का शिवसेनेला बसला. या निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेने तीन जागा पटकावल्या.
२०१२ मध्ये काँग्रेसने मतभेद विसरून आघाडी केली होती. परंतु, सेनेच्या जागा ५४ वर गेल्या. राष्ट्रवादीच्या जागा २५ वरून ३४ वर गेल्या. कॉंग्रेसच्या जागा १७ झाल्या. भाजपाच्या वाट्याला आठ जागा आल्या. मनसेनेही तीनवरून सातपर्यंत मजल मारली. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेला चांगलीच कसरत करावी लागली.

Web Title: The throats of the power of the monopoly power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.