रायगड महोत्सवाच्या माध्यमातून पर्यटकांना शिवकालीन इतिहास अनुभवता येणार – विनोद तावडे
By admin | Published: November 4, 2015 06:39 PM2015-11-04T18:39:48+5:302015-11-04T18:39:48+5:30
रायगड किल्ला म्हणजे महाराष्ट्राच्या गौरवाचे प्रतिक आहे. महाराष्ट्राचा हा गौरव देशभरासह जगभरातील पर्यटकांपर्यंत पोहचविण्यासाठी तसेच पर्यटकांना शिवकालीन इतिहास अनुभवता येणार आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि ४ - रायगड किल्ला म्हणजे महाराष्ट्राच्या गौरवाचे प्रतिक आहे. महाराष्ट्राचा हा गौरव देशभरासह जगभरातील पर्यटकांपर्यंत पोहचविण्यासाठी तसेच पर्यटकांना शिवकालीन इतिहास अनुभवता यावा यासाठी येत्या २६ डिसेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान पाच दिवस रायगड महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी आज दिली.
रायगड किल्ल्यावर आयोजित करण्यात येणा-या महोत्सावाच्या अनुषंगाने आज सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. तावडे यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस कोकणचे विभागीय आयुक्त तानाजी सत्रे, रागयड जिल्हयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपटटे यांच्यासह रायगड जिल्हयातील विविध प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी उपस्थित होते.
श्री. तावडे म्हणाले की, रायगड महोत्सवाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य कर्तृत्व आणि रोमहर्षक इतिहास नवीन पिढीसमोर मांडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. रायगड किल्ला आणि रायगड किल्ल्याच्या पायथ्यापाशी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असून दोन्ही ठिकाणांसाठीचे योग्य नियोजन करण्यात येणार आहे.
शिवछत्रपती महाराज एक शूर योध्दे म्हणून जगप्रसिध्द आहेत. पण शिवाजी महाराज हे एक व्यवस्थापन गुरु होते. शिवाजी महाराजांनी त्या काळात वनसंरक्षण,पर्यावारण, दुष्काळ निवारण या व्यवस्थेमध्येही उत्तम नियोजन केले होते. त्यांचे हे कौशल्य देखाव्याच्या स्वरुपात पुन्हा मांडण्यात येणार आहे. या महोत्सवासाठी ऑनलाईन बुकिंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. महोत्सवाच्या या व्यवस्थेमध्ये स्थानिक गावक-यांचेही सहकार्य घेण्यात येणार आहे, असेही तावडे यांनी सागितले.