संत साहित्याच्या अभ्यासातून मायमराठी जगभरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 03:36 AM2020-02-27T03:36:28+5:302020-02-27T03:37:18+5:30
संत एकनाथ महाराज मिशन; बारा हजार जणांनी केला अभ्यास
- सुदाम देशमुख
अहमदनगर : ‘संस्कृत वाणी देवे केली, तरी पाकृत काय चोरापासूनी जाली’? असा रोखठोक सवाल करणाऱ्या पैठणच्या संत एकनाथ महाराजांनी साहित्याचे भांडार समृद्ध करून मराठी भाषेचा गोडवा वाढविला. त्यांच्या नावाने चालविल्या जाणाºया पैठणच्या शांतीब्रह्म संत श्री. एकनाथ महाराज मिशनतर्फे वारकरी संप्रदाय आॅनलाईन परीक्षा (अभ्यासक्रम) हा उपक्रम राबविला जातो. यात आतापर्यंत महाराष्ट्र आणि देशाबाहेरील तब्बल १२ हजार जणांनी सहभाग घेऊन संत साहित्याचा अभ्यास केला आहे.
संत एकनाथ महाराजांचे १५ वे वंशज योगिराज महाराज गोसावी यांनी २००६ मध्ये संत एकनाथ महाराज यांच्या नावाने संस्थेची स्थापना करून संकेतस्थळही सुरू केले. यावर संत एकनाथ महाराजांचे सर्व साहित्य पहायला मिळते. नाथ महाराजांचा शांती, समतेचा संदेश सर्वत्र पोहोचविणे, साहित्याचा प्रचार करणे हा मिशनचा उद्देश आहे. गोसावी यांनी महाराष्ट्रातील सर्वच संतांच्या साहित्याचा अभ्यास व्हावा, या उदार हेतूने चार वर्षांपासून मिशनच्या माध्यमातून आॅनलाईन अभ्यासक्रम सुरू केला.
कुठेही न जाता बसल्या जागेवरून,केवळ मोबाईलचा वापर करून संत साहित्याची आवड असणाºया कोणालाही या अभ्यासक्रमात सहभाग घेता येतो. गेल्या चार वर्षात १२ हजार जणांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.
आॅनलाइन पारायण
एकनाथी भागवताचे आॅनलाईन पारायण हा उपक्रमही मिशनतर्फे चालविला जात आहे. सध्या सहा व्हॉटस् अॅप ग्रुपवर दीड हजार जणांनी पारायणात सहभाग घेतला आहे.
वारकरी संप्रदायातील सर्व संतांच्या साहित्याचा समावेश करूनच आॅनलाईन अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नव्या पिढीने, महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर राहणाºया मराठीप्रेमींनी, संत साहित्याची आवड असणाºया सर्वांना संतांच्या साहित्याचा अभ्यास व्हावा, याच हेतूने अभ्यासक्रमाची रचना केली आहे. त्यामुळेच आतापर्यंत महाराष्ट्रासह विदेशातील मराठी माणसांनीही अभ्यास पूर्ण केला आहे. -योगिराज महाराज गोसावी,
संत श्री एकनाथ महाराज यांचे १५ वे वंशज, पैठण