भगव्या वादळाचा नि:शब्द हुंकार!

By admin | Published: November 7, 2016 03:21 AM2016-11-07T03:21:42+5:302016-11-07T03:21:42+5:30

मुंबईत मोर्चाऐवजी ‘महामोर्चा’ काढण्याची घोषणा करणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चाने अखेर रंगीत तालीम म्हणून मुंबईत रविवारी बाइक रॅली काढली

Thunder | भगव्या वादळाचा नि:शब्द हुंकार!

भगव्या वादळाचा नि:शब्द हुंकार!

Next

समीर कर्णुक/महेश चेमटे, मुंबई
मुंबईत मोर्चाऐवजी ‘महामोर्चा’ काढण्याची घोषणा करणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चाने अखेर रंगीत तालीम म्हणून मुंबईत रविवारी बाइक रॅली काढली. मराठा समाजाच्या मागण्या आणि आक्रोशाला नि:शब्दपणे वाट करून देण्यासाठी या वेळी सुमारे सव्वा लाख बाइकस्वारांनी रॅलीत सहभाग घेतला. मात्र, मुंबईच्या इतिहासातील सर्वांत मोठी बाइक रॅली शांतपणे काढून मराठा क्रांती मूक मोर्चाने ही रॅली म्हणजे वादळापूर्वीची शांतता असल्याचे सांगितले आहे.
सुट्टीचा दिवस असतानाही चुनाभट्टीतील सोमय्या मैदानाजवळ सकाळी साडेआठ वाजल्यापासूनच तरुण-तरुणी दुचाकी घेऊन हजर झाले होते. नियोजित वेळेनुसार सकाळी ९ वाजता बाइक रॅलीला सुरुवात होणार होती. मात्र हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच बाइक जमा झाल्या होत्या. त्यामुळे मुंबईतील रॅलीबाबत आयोजकांना साशंकता वाटत होती. मात्र अवघ्या तासाभरात बाइकस्वारांचे लोंढे येऊन धडकू लागले. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत हा आकडा हजारोंच्या घरात गेला. त्यामुळे चेंबूर आणि कुर्ल्यापर्यंत दुचाकींच्या रांगा लागल्या होत्या.
मुंबईतील या बाइक रॅलीला नवी मुंबई, ठाणे, कल्याणसह पुणे, रत्नागिरी आणि नाशिक जिल्ह्यातील तरुणांनीही हजेरी लावली होती. तरुणांच्या जोडीला तरुणीदेखील बाइक घेऊन या रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या. रॅलीचे नेतृत्व महिलांच्या हाती सोपवण्यात आले होते. सकाळी १० वाजता सुरू झालेली रॅली अर्ध्या तासात सायन सर्कलपर्यंत पोहोचली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर येताच रॅलीने वेग पकडला आणि अवघ्या तासाभरात ही
रॅली सीएसटीला पोहोचली. तरीही या रॅलीचे शेपूट मात्र सोमय्या मैदानावरच होते.


भगव्या फेट्यांनी सज्ज असलेल्या तरुणी, एकामागोमाग निघालेल्या बाइक आणि खाकीच्या खड्या पहाऱ्यात वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करणारी तरुणाई, असे काहीसे चित्र रविवारी मुंबईच्या रस्त्यावर दिसून आले. राज्यभरात सुरू असलेला मराठा क्रांती मूक मोर्चा अखेर मुंबईत धडकला, तो भव्य रॅलीच्या स्वरूपातच.
शनिवारी मध्यरात्रीपासूनच रॅलीसाठी तरुणाईची जय्यत तयारी सुरू होती. सोशल मीडियावर तरुण-तरुणींच्या समूहामध्ये बाइक रॅलीसाठी कोणते कपडे घालायचे, ते रॅलीची सांगता झाल्यावर कुठे थांबायचे? या चर्चेला उधाण आले होते. सुट्टीच्या दिवशी आउट आॅफ स्टेशन जाणारे मुंबईकर विशेष वेळ काढून मोठ्या संख्येने रॅलीत सामील झाल्याचे दिसले. तरुणाईसोबत लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनीही रॅलीत उत्साहात सहभाग नोंदवला. बालशिवाजीची वेशभूषा केलेले चिमुरडे सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. पारंपरिक वेषभूषा केलेल्या महिलांसोबत शॉर्ट कुर्ता परिधान केलेल्या तरुणींनी नाकात नथ घालत, मोर्चात सहभाग घेतला.
मराठा क्रांती मूक मोर्चा स्टिकर आणि भगवा झेंडा घेत, चारचाकी वाहनेदेखील रॅलीत सहभागी झाली. दादर, परळ, लालबाग, भायखळा परिसरात रॅली मार्गस्थ होताना, रस्त्यांच्या दुतर्फा बघ्यांची गर्दी जमलेली होती. त्यात ही रेकॉर्डब्रेक रॅली मोबाइलमध्ये कैद करण्यासाठी बघ्यांची एकच तारांबळ उडालेली दिसून आली.


पोलिसांचा चोख बंदोबस्त
राज्यातील इतर मराठा क्रांती मूक मोर्चांप्रमाणे ही बाइक रॅली शांततेत पार पडावी, यासाठी मुंबई पोलिसांनी बाइक रॅलीच्या सर्व मार्गांवर चोख बंदोबस्त ठेवला होता. अपर पोलीस आयुक्त मनोज लोहिया आणि झोन ६चे पोलीस उपायुक्त शहाजी उमप हेदेखील लक्ष ठेवून होते. मुंबईतील झोन १ ते झोन ६पर्यंतचे सर्वच पोलीस ठाण्यांतील अधिकारी आणि कर्मचारी सुट्टी असतानाही मोर्चाच्या बंदोबस्तासाठी तैनात असल्याची माहिती पोलीस प्रवक्ता अशोक दुधे यांनी दिली.

अखेर वाहतूक ठप्प
राज्यभर निघणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चांप्रमाणेच मुंबईतील बाइक रॅलीला मोठी गर्दी होणार असल्याची कल्पना वाहतूक पोलिसांना होती. त्या पार्श्वभूमीवर मोठ्या वाहनचालकांना सायन-पनवेल मार्गावरून प्रवेश बंदी केली होती. केवळ छोट्या वाहनांसाठी सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत सायन-पनवेल मार्ग खुला ठेवण्यात आला होता. मात्र त्यानंतर, या मार्गावरील सर्व वाहतूक प्रियदर्शनी सर्कलजवळ थांबवून वडाळामार्गे वळवण्यात आली. परिणामी, मानखुर्द आणि घाटकोपरपर्यंत वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या. १० मिनिटांचे अंतर कापण्यासाठी वाहनचालकांना तासभर लागत होता. अखेर दुपारी १ वाजल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

रॅलीमुळे स्त्रीशक्ती जागृत
मराठा क्रांती मूक मोर्चामुळे मराठा समाज मोठ्या प्रमाणात एकत्र आला आहे. मुंबईतील रॅलीत महिला दुचाकीस्वारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे. किंबहुना, मराठा रॅलीमुळे स्त्रीशक्ती जागृत करण्याचे काम आयोजकांनी केले आहे. मराठा समाज असाच एकसंध आणि एकत्रित राहिला, तर विविध समस्यांना वाचा फोडण्याची क्षमता समाजात आहे.
- रूपाली दाते, वकील

एक मराठा ‘साथ’ मराठा
मराठा क्रांतीमुळे विखुरलेला मराठा समाज एका विषयावर एकत्र आला आहे. ‘एक मराठा, लाख मराठा’ या ब्रीदवाक्यासह ‘एक मराठा, साथ मराठा’चे दर्शन रॅलीत दिसून आले. - रूपेश चोपडे, मॅकॅनिकल इंजिनीअर

Web Title: Thunder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.