आजपासून रंगणार थरार
By admin | Published: March 3, 2017 05:27 AM2017-03-03T05:27:24+5:302017-03-03T05:27:24+5:30
सी.एस. संतोष आणि गौरव गिल हे दोन्ही भारतीय ड्रायव्हर गुणवान असून त्यांच्या कामगिरीमुळे नक्कीच पॉवरबोट भारतात लोकप्रिय होईल.
मुंबई : सी.एस. संतोष आणि गौरव गिल हे दोन्ही भारतीय ड्रायव्हर गुणवान असून त्यांच्या कामगिरीमुळे नक्कीच पॉवरबोट भारतात लोकप्रिय होईल. मुंबईतील पॉवरबोट रेसिंगच्या पात्रता फेरीमध्ये हे दोघेही चमकदार कामगिरी करुन स्वत:ला सिध्द करतील, असा विश्वास सात वेळचा पॉवरबोट जागतिक अजिंक्यपद विजेता निल होल्म्स याने व्यक्त केला. विशेष म्हणजे होल्म्स यांच्याच मार्गदर्शनाखाली संतोष आणि गौरव यांनी पॉवरबोटमध्ये आपली छाप पाडली आहे.
शुक्रवारी दुपारी २ वाजल्यापासून मरिन ड्राइव्ह येथे पॉवरबोट रेसिंगचा थरार मुंबईकरांना अनुभवता येईल. होल्म्स यांनी स्पर्धेविषयी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दोन्ही भारतीय ड्रायव्हर्सनी होल्म्स यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला. याजोरावरच त्यांनी भारतातील पहिल्या पॉवरबोट रेसिंगसाठी आवश्यक असलेला परवाना मिळवला. या शर्यतीचा फारसा अनुभव संतोष व गौरव यांच्याकडे नसला, तरी त्यांच्यावर सर्वांच्या नजरा असतील. आर. एस. बूस्टर संघाकडून सहभागी होणाऱ्या संतोषला मार्टिन रॉबिनसन या ब्रिटिश नेव्हिगेटरची साथ मिळेल. तर, गौरव अल्ट्रा शार्क संघाकडून खेळणार असून त्याच्यासह नेव्हिगेटर अमेरिकेचा जॉर्ज आयवेचा सहभाग असेल. (क्रीडा प्रतिनिधी)
>जॉय आॅफ वॉटर...
भारतात पहिल्यांदाच रंगणाऱ्या पी-वन पॉवरबोट रेसिंगच्या मध्यमातून समुद्रकिनारा संवर्धनाचा सामाजिक संदेशही यावेळी देण्यात येणार आहे. यासाठी ‘जॉय आॅफ वॉटर’ या विशेष उपक्रमाअंतर्गत नागरिकांना समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्यासाठी आवाहन करण्यात येईल.