‘परे’वर सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट
By admin | Published: April 3, 2017 02:47 AM2017-04-03T02:47:13+5:302017-04-03T02:47:13+5:30
गर्दुल्ल्यांसह चोरांकडून लोकलच्या दरवाजावर उभ्या असलेल्या महिलांची सोनसाखळी खेचल्याच्या घटना घडत आहेत.
मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर वांद्रे ते खार रोडदरम्यानच्या सिग्नलवर लोकल धिमी होत असतानाच, येथे लपून बसलेल्या गर्दुल्ल्यांसह चोरांकडून लोकलच्या दरवाजावर उभ्या असलेल्या महिलांची सोनसाखळी खेचल्याच्या घटना घडत आहेत. येथील सिग्नलच्या ठिकाणी लोकलचा वेग मंदावला असताना, खांबामागे लपून बसलेले गर्दुल्ले आणि चोर हे कृत्य करत असून, नुकतेच घडलेल्या घटनेची नोंद वांद्रे रेल्वे पोलिसात करण्यात आली आहे.
मागील आठवड्यात दोन महिलांची सोनसाखळी अशा रीतीने खेचण्यात आली असून, या घटनांना रोखण्यासाठी येथे संरक्षक भिंत बांधण्यासह दिवे बसवण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान, लोकलच्या दरवाजावर उभे राहू नये, अशा सूचना वारंवार प्रशासनाकडून प्रवाशांना करण्यात येतात. (प्रतिनिधी)
>रेल्वेच्या सूचनेचे पालन केले जात नाही. त्यामुळे प्रवासीही तेवढेच जबाबदार आहेत. खार रोड ते वांद्रे या ठिकाणावरील सोनसाखळी चोरीची पहिलीच तक्रार नोंद झालेली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आम्ही विशेष पथक नेमले आहे. परिणामी, लवकरच हे प्रकरण तडीस जाईल.
- सुनील तोंडवळकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वांद्रे स्थानक