वादळाने विजेचे ५८ खांब कोसळले
By admin | Published: May 21, 2016 01:02 AM2016-05-21T01:02:46+5:302016-05-21T01:02:46+5:30
सोमेश्वरनगर (ता. बारामती) परिसराला गुरुवारी (दि. १९) चक्रीवादळाचा तडाखा बसला.
सोमेश्वरनगर : सोमेश्वरनगर (ता. बारामती) परिसराला गुरुवारी (दि. १९) चक्रीवादळाचा तडाखा बसला. वाऱ्याच्या प्रचंड वेगाने अनेक घरांचे पत्रे उडाले. अनेक वृक्ष उन्मळून पडले. तसेच परिसरातील तब्बल ५८ विद्युत खांब कोसळले आहेत. त्यामुळे ५ किलोमीटर पर्यंत विद्युत तारा तुटल्या आहेत. कोसळलेले विद्युत खांब शोधण्याची मोहीम सुरूच आहे. आणखी २५ ते ३० कोसळलेले खांब सापडतील असे महावितरणने सांगितले आहे.
गुरुवारी सायंकाळी सोमेश्वरनगर परिसरामध्ये अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. पावसाबरोबर वाहणाऱ्या वाऱ्याचे अचानक चक्री वादळामध्ये रूपांतर झाल्याने अवघ्या एकाच तासात होत्याचे नव्हते झाले. घरांचे पत्र उडणे, भिंती कोसळणे, विद्युत खांब कासळणे, वृक्ष उन्मळून पडणे, टोमॅटो कोथिंबीर, कारली, दोडका, कडवळ यासारखी पिके अक्षरश: भुईसपाट झाली. त्याबरोबर उसाची पिकेही काही ठिकाणी भुईसपाट झाली. घरांची कौले उडणे, टेलिव्हिजनचे डिश उडून जाणे, पत्र्यांची शेड कोसळणे, नारळाची झाडे कोसळणे असे प्रकार घडले. अनेक रस्त्यांवर वृक्ष कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
मळशी ते सोमेवर कारखाना दरम्यान नीरा डाव्या कालव्याचा रस्ता वृक्ष पडल्याने अजूनही बंदच आहे. शेतकऱ्यांबरोबर सर्वांत जादा नुकसान महावितरणचे झाले आहे. परिसरातील तब्बल ५८ विद्युत खांब कोसळले आहेत. वादळी वाऱ्यानंतर महावितरणने तातडीने २४ कर्मचारी असलेल्या ३ गँगमनच्या तुकड्यांना पाचारण केले आहे. सकाळपासूनच विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी व गँगमन मिळून खांब उभे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शुक्रवारी (दि. २०) सकाळपासून वाणेवाडी, वाघळवाडी, मुरूम या ठिकाणावरील विद्युत पुरवठा सुरू करण्यात महावितरणला यश आले आहे. सर्वांत जादा नुकसान झालेल्या मळशी गावामध्ये शनिवारी (दि. २१) संध्याकाळपर्यंत वीजपुरवठा सुरू होऊ शकतो असे सोमेश्वरनगर येथील महावितरणचे उपअभियंता अभिजित बिरनाळे यांनी सांगितले. या चक्रीवादळामध्ये महावितरणचे जवळपास ५ ते ६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अशी माहितीही त्यांनी दिली. (वार्ताहर)
>शहारे आणणारे वादळ
गेल्या दोन वर्षांपूर्वी सोमेश्वरनगर परिसराला अशाच प्रकारच्या चक्रीवादळाने तडखा दिला होता. त्या वेळी दीड ते दोन हजार वृक्ष पडले होते. तर १५०च्या वर विद्युत खांब कोसळल्याने तब्बल १५ दिवस सोमेश्वरनगर परिसर अंधारात होता. त्याच चक्रीवादळाची आठवण सोमेश्वरवासीयांना झाली होती.