दक्षिण भारतात वादळी पावसाची शक्यता; कोकण, गोवा, मराठवाड्यातही बरसणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 02:47 AM2019-10-31T02:47:19+5:302019-10-31T02:47:50+5:30
रेड व ऑरेंज अलर्ट
चेन्नई : देशाच्या अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम असून, लक्षद्वीपमध्ये दोन दिवसांसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. केरळमधील सहा जिल्ह्यांत ऑरेंज अॅलर्ट तर तिरुवनंतपुरम, त्रिशूर व पलक्कड जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. मराठवाडा, कोकण, गोवा येथे वादळ वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
तिरुवनंतपुरममध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. स्कायमेट संस्थेच्या माहितीनुसार, अरबी समुद्रात चक्रीवादळ बनत असून, ते महा या नावाने ओळखले जाईल. महा वादळामुळे तामिळनाडू, केरळ, कर्नाटकसह लक्षद्वीपमध्ये जोरदार पाऊस होईल. समुद्रामध्ये १५ फूट उंच लाटा उसळतील. पुडुच्चेरी, कराईकल, आंध्र प्रदेशचा किनारी भाग व तेलंगणातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाडा, कोकण, गोवा येथे वादळ वाºयासह पावसाची शक्यता आहे. तामिळनाडूच्या सहा जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक संस्था बुधवारी बंद होत्या. सर्वच मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
रेड,ऑरेंज अलर्ट म्हणजे काय?
पावसासह ताशी १३० किमी वेगाने वारे वाहत असतील तर त्या भागात रेड अलर्ट जारी केला जातो. तिथे मोठे नुकसान व पुराची शक्यता असते.
रस्ते आणि हवाई वाहतुकीत व्यत्यय होण्यासह जीवित आणि वित्त हानीची शक्यता असल्यास ऑरेंज अॅलर्ट जारी केला जातो.