दलाई लामांच्या स्वागतास तिबेटियन बांधवांत उत्सुकता
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 02:47 AM2019-11-22T02:47:25+5:302019-11-22T02:52:34+5:30
अहिंसेच्या मार्गाने तिबेट स्वतंत्र व्हावा हीच इच्छा
- प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद : धम्म परिषदेच्या निमित्ताने बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांचे शुक्रवारी शहरात आगमन होत आहे. ५५ वर्षांनंतर शहरात येत असलेल्या धर्मगुरूंच्या स्वागतासाठी शहरात जय्यत तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे निर्वासित तिबेटियन बांधवांमध्येही आनंदाचे वातावरण पसरले आहे. आपल्या लाडक्या धर्मगुरूंचे कधी एकदा जवळून दर्शन होते, याची प्रचंड उत्सुकता त्यांच्यात निर्माण झाली आहे.
तिबेटी जनतेसाठी दलाई लामा म्हणजे सर्वेसर्वा. १४ व्या लामांचे नेतृत्व तिबेटी जनतेने राजकीय व धार्मिक नेतृत्व म्हणून स्वीकारले आहे. शहरात निर्वासित तिबेटियन बांधवांचे कॅम्प नाहीत; पण १९८० पासून दरवर्षी न चुकता हे बांधव गरम कपडे घेऊन शहरात वास्तव्याला येतात. आता तर तिबेटियन बांधव आले की, हिवाळा सुरू झाला असे समीकरणच जुळले आहे.
तिबेटियनच्या स्वेटर्स मार्केटमध्ये भगवान गौतम बुद्धांची मूर्ती व धर्मगुरू दलाई लामा यांचे छायाचित्र ठेवण्यात आले आहे. मार्केट सुरू करण्यापूर्वी येथे सर्व तिबेटियन बांधव दिवा लावतात, अगरबत्ती लावतात व साधना करतात. धर्मगुरू दलाई लामा औरंगाबादेत येणार ही माहिती मिळताच या बांधवांमध्ये आनंद पसरला. यासंदर्भात तिबेटियन मार्केटचे अध्यक्ष टी. यारफेल यांनी सांगितले की, धर्मगुरू दलाई लामा यांना आम्ही बोधिसत्त्व व संरक्षक संत अवलोकितेश्वर यांचा अवतार मानतो. आम्हालाही त्यांचे स्वागत करता यावे. यासाठी आम्ही धम्म परिषदेचे आयोजक हर्षदीप कांबळे यांना भेटलो आहोत.
चीनने तिबेटियनांवर अनन्वित अत्याचार केले. १७ मार्च १९५९ रोजी दलाई लामा हे सुमारे ८० हजार तिबेटियनांसोबत भारतात वास्तव्यास आले. आजमितीस भारतात तिबेटियनांची संख्या सुमारे सव्वालाखाच्या आसपास आहे. सर्वाधिक तिबेटियन बांधव कर्नाटक राज्यात राहतात. त्याखालोखाल हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, ओडिसा, महाराष्ट्र, छत्तीसगड, पश्चिम बंगाल येथील निर्वासित कॅम्पमध्ये राहतात. शहरात सध्या स्वेटर्स विक्रीच्या निमित्ताने ३० पुरुष व ३० महिला तिबेटियन आले आहेत.
धर्मगुरूंना भेटण्यासाठी आम्ही अधूनमधून हिमाचल राज्यातील धर्मशाळा येथे जात असतो. मी यापूर्वी धर्मगुरूंचे तिथेच दुरून दर्शन घेतले आहे. त्यांचे जवळून दर्शन घेण्याची इच्छा आहे. शहरातील औरंगाबाद लेणीच्या पायथ्याशी असलेल्या बुद्धविहारात आम्ही साधना, प्रार्थनेसाठी जात असतो. सर्व तिबेटियन बांधवांची एकच इच्छा आहे की, ‘तिबेट स्वतंत्र’ व्हावा व तोही अहिंसेच्या मार्गाने.
शहरातील तिबेटियनमध्ये माजी सैनिक
लोपसंग ताशी यांनी सांगितले की, शहरात उबदार कपडे विक्रीसाठी आलेल्या तिबेटियन बांधवांमध्ये १० जण माजी सैनिक आहेत. त्यातील काही जणांनी कारगिल युद्ध, तर काही जणांनी भारत-पाकिस्तान युद्ध लढले आहे. आम्ही निर्वासित असलो तरी भारतीयांनी आम्हाला निर्वासिताची कधी वागणूक दिली नाही. एवढे प्रेम भारतीयांनी आम्हाला दिले आहे.
‘खाता’ देऊन दलाई लामांचे होणार स्वागत
तिबेटियन बांधवांमधील ज्येष्ठ सदस्य एस.डी. छौपेल यांनी सांगितले की, तिबेटियन लोक आनंदाच्या प्रसंगी मान्यवरांचे स्वागत खाताने (पांढरे उपरणे) देऊन करीत असतात. या खातावर ‘अष्टांग चिन्ह’ असते. या ‘खाता’ला तिबेटियन संस्कृतीत मोठे महत्त्व आहे. याच ‘खाता’ने आम्ही धर्मगुरू दलाई लामा यांचे शहरात स्वागत करू. यासाठी सुमारे दोन ते अडीच फुटांचा पांढराशुभ्र ‘खाता’ आणला आहे.
10 डिसेंबर १९८९ यादिवशी तिबेटियन धर्मगुरू दलाई लामा यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला. तिबेटियन बांधवांसाठी हा दिवस अभिमानाचा व गौरवाचा ठरला.
यामुळे दरवर्षी जिथे असले तिथे तिबेटियन बांधव १० डिसेंबर रोजी वर्धापन दिन म्हणून साजरा करतात. शहरातही यादिवशी विशेष कार्यक्रम आम्ही घेत असतो, असेही छौपेल यांनी सांगितले.