पीपीपी मॉडेलनुसार तिकिटांचे आरक्षण : मध्य रेल्वेचा प्रस्ताव
By admin | Published: August 27, 2014 04:44 AM2014-08-27T04:44:23+5:302014-08-27T04:44:23+5:30
आरक्षित तिकिटांचा गैरव्यवहार रोखण्याच्या उद्दिष्टाने रेल्वे प्रशासनाने पीपीपी मॉडेलनुसार आरक्षण कार्यालय सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे
मुंबई : आरक्षित तिकिटांचा गैरव्यवहार रोखण्याच्या उद्दिष्टाने रेल्वे प्रशासनाने पीपीपी मॉडेलनुसार आरक्षण कार्यालय सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून यावर काम सुरु करण्यात आले असून इच्छुक लोकांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. पीपीपी मॉडेलनुसार तिकिटांचे आरक्षणाचे काम हे संबंधित काम मिळालेली व्यक्ती शॉपिंग मॉल, सुपर मार्केटमध्ये कार्यालय किंवा केंद्र थाटून करु शकते, असे रेल्वेकडून सांगण्यात आले.
प्रवासी तिकिट सुविधा केंद्र योजनेनुसार सुरु करण्यात येणाऱ्या या केंद्रात लांब पल्ल्याच्या गाड्यांचे आरक्षित तिकिटांबरोबरच अनारक्षित तिकिटसुध्दा दिले जाणार आहे. रेल्वे मंत्रालयाकडून यासंदर्भात ८ आॅगस्टला नविन योजना आणली होती. त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी मध्य रेल्वेकडून आता सुरु करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सुरु करण्यात येणारे तिकिट केंद्रांवर सामान्य स्लीपर क्लास तिकिटांसाठी ३0 रुपये तसेच एसी श्रेणी तिकिटांसाठी ४0 रुपये सर्व्हिस चार्ज घेण्यात येणार आहे. आरक्षित तिकिटांची काळाबाजारी रोखतानाच तिकिटांच्या रांगेतून सुटका करण्याचा हा प्रयत्न असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. त्यामुळेच ही सेवा मार्केट, सुपर मार्केट तसेच शॉपिंगमध्ये कार्यालय थाटून संबंधित व्यक्ती घेऊ शकतो. याबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेन्द्र पाटील यांनी सांगितले की, नविन योजनेनुसार ही सेवा देण्यात येणार आहे. तिकिटांच्या रांगेतून सुटका करण्यासाठीच ही सेवा सुरु केली जात आहे. रेल्वे ट्रॅव्हल सर्व्हिसेस दलालाचा पाच वर्षाचा अनुभव असलेल्यांनाच ही सेवा सुरु करता येणार आहे. (प्रतिनिधी)