वाहकांच्या गळ्यात पुन्हा तिकिटांचा ट्रे
By Admin | Published: November 19, 2014 10:57 PM2014-11-19T22:57:09+5:302014-11-19T23:26:35+5:30
रत्नागिरी विभाग : नऊ कोटींची तिकिटे शिल्लक
मेहरून नाकाडे - रत्नागिरी -राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे गेल्या तीन ते चार वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक्स तिकीट मशीनद्वारे (इटीआयएम) प्रवाशांना तिकिटेदेण्यात येत आहेत; परंतु रत्नागिरी विभागात नऊ कोटी १६ लाख ९४ हजार ६५१ रुपयांचा तिकीटसाठा शिल्लक राहिल्याने तो संपविण्यासाठी वाहकांच्या गळ्यात पुन्हा एकदा तिकिटांचा ट्रे आला आहे. महिनाभरात पाच कोटी ४५ लाख ४०० रुपयांची तिकिटे संपविण्यात आली.
राज्य मार्ग परिवहन महामंडळानेही आता कात टाकण्यास प्रारंभ केला आहे. तिकीट आरक्षण संगणकीकृत केले आहे. इलेक्ट्रॉनिक्स तिकीट मशीनद्वारे शहरी व लांब फेऱ्यांच्या एस.टी.तून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकिटांचे वितरण करण्यात येत होते. या मशीनवरून तिकीट देणे वाहकांना सोपे होत असे. शिवाय इलेक्ट्रॉनिक्स मशीनमुळे प्रत्येक फेरीचा हिशेब लिहिण्याची कटकट संपली होती. मात्र, आता जुनी तिकिटे मोठ्या प्रमाणावर शिल्लक असल्याने एस.टी. पुन्हा चार वर्षे मागे गेली आहे. वाहकांच्या गळ्यात पुन्हा तिकिटांचा ट्रे देण्याचा निर्णय एस. टी. महामंडळाने घेतला.
तिकीट ट्रेचा वापर सुरू झाला असून, त्यामुळे तिकिटे किती संपली, किती रुपयांची संपली, याचा सर्व
हिशेब लिहून ठेवावा लागत आहे. मशीनचा वापर सुरू झाल्यानंतर हिशेबाची कटकट संपल्याने वाहकांनी समाधान व्यक्त केले होते, परंतु या मशीनचा वापर करण्यापूर्वी छपाई केलेला तिकीटसाठा संपविण्याचे आदेश प्रशासनाने प्रत्येक विभागाला दिले असून, सध्या वाहकांना इलेक्ट्रॉनिक्स मशीन वापरण्यास प्रशासनाने बंदी केली आहे.
रत्नागिरी विभागातील नऊ कोटी १६ लाख ९४ हजार ६५१ रुपयांचा तिकीटसाठा शिल्लक राहिला होता. शिल्लक राहिलेला तिकिटांचा साठा खराब होऊ नये, शिवाय महामंडळाचा खर्च वाया जाऊ नये यासाठी पुन्हा एकदा तिकिटांचे वितरण सुरू करण्यात आले आहे.
पाच कोटींचा साठा संपला
केवळ दहा दिवसांसाठी लागणारा तिकीटसाठा शिल्लक ठेवून उर्वरित सर्व तिकिटे संपविण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. त्यानुसार वाहक सध्या तिकीट ट्रेमधील तिकिटे पंचिंग करून देत आहेत. सर्व आगारांतून आतापर्यंत पाच कोटी ४५ लाख ४०० रुपयांचा तिकीटसाठा संपविण्यात आला आहे.