ए दिल...ची मुश्किल वाढवणा-या मनसे कार्यकर्त्यांच्या पत्नींना तिकीट
By admin | Published: February 16, 2017 04:23 PM2017-02-16T16:23:45+5:302017-02-16T16:23:45+5:30
पाकिस्तानी कलाकार फवाद खानचा सहभाग असलेल्या 'ए दिल है मुश्किल' सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोध करणा-या मनसे कार्यकर्त्यांच्या पत्नींना राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीचे तिकीट दिले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16 - पाकिस्तानी कलाकार फवाद खानचा सहभाग असलेल्या 'ए दिल है मुश्किल' सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोध करणा-या मनसे कार्यकर्त्यांच्या पत्नींना राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीचे तिकीट दिले आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या या सिनेमाला विरोध करण्यासाठी मनसेच्या 12 कार्यकर्त्यांनी मुंबई मेट्रो सिनेमागृहात घुसण्याचा प्रयत्न केला होता. सिनेमात पाकिस्तानी कलाकार फवाद खान असल्याने मनसेकडून तीव्र विरोध करण्यात आला. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांविरोधात अटकेची कारवाई करण्यात आली होती. यातील दोन कार्यकर्त्यांच्या पत्नींना मनसेकडून मुंबई मनपाचे तिकीट देण्यात आले आहे.
प्रीती गव्हाणे आणि वैशाली गंगावणे अशी या दोघींची नावं आहेत. या सर्व घडामोडींवेळी या दोघीही भलत्याचा चर्चेत आल्या आहेत. प्रीती गव्हाणे मनसे विभागीय अध्यक्ष शेखर गव्हाण यांच्या पत्नी आहेत. या चंदनवाडीतील धोबी तलाव वॉर्ड क्रमांक 222 येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. शेखर गव्हाणे यांना मनसेच्या अन्य 12 कार्यकर्त्यांसोबत ऑक्टोबर 2016 मध्ये अटक करण्यात आली होती.
तर शेजारील वॉर्ड क्रमांक 225 मधून वैशाली गंगावणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वैशाली या मनसे कार्यकर्ता सचिन गंगावणे यांच्या पत्नी आहेत, सचिन यांनाही मेट्रो सिनेमामध्ये घुसण्याच्या प्रयत्नात अटक झाली होती. कुलाबामधील मनसेचे उपविभागीय प्रमुख निशांत गायकवाड यांनी सांगितले की, आम्ही आमच्या क्षेत्रातील पार्किंग, रस्त्यांच्या दुरवस्थेसंबंधीत मुद्दे उपस्थित करत आहोत. शिवाय, 'ए दिल है मुश्किल' सिनेमाला आम्ही केलेला विरोधही लोकांना सांगत आहोत. पाकिस्तानी कलाकारांवर आम्हाला बंदी हवी आहे. हा मुद्दा देशभक्तीशी जोडलेला असून लोकांना याची माहिती आहे. दरम्यान,निशांत यांनाही 'ए दिल...'विरोधातील आंदोलनात अटक करण्यात आली होती.
नेमके काय घडले होते?
19 ऑक्टोबर 2016 रोजी मनसेच्या 12 कार्यकर्त्यांना दक्षिण मुंबईतील मेट्रो सिनेमागृहात घुसण्याच्या प्रयत्नात अटक करण्यात आली होती. 'ए दिल है मुश्किल' सिनेमामध्ये पाकिस्तान कलाकार फवाद खान असल्याने सिनेमाच्या प्रदर्शनाला मनसेकडून तीव्र विरोध करण्यात आला होता. उरी येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मनसेने पाकिस्तानी कलाकारांना भारतात बंदी घालण्याची मागणी केली होती. दरम्यान, या आंदोलनावेळी पोलिसांनी सिनेमागृहात घुसखोरीचा प्रयत्न करणा-या मनसेच्या 12 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते.