13 पैकी सात खासदारांची तिकीटे कापली, आता मातोश्रीची आठवण येत असेल; ठाकरे गटाने शिंदेंच्या जखमेवर मीठ चोळले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 10:57 AM2024-04-05T10:57:43+5:302024-04-05T10:58:42+5:30
Varun Sardesai - Shrikant Eknath Shinde सर्व्हे निगेटिव्ह असल्याने श्रीकांत शिंदे यांच्या नावाची शिवसेनेकडून अधिकृत घोषणा होत नाही - वरुण सरदेसाई
एकनाथ शिदेंसोबत गेलेल्या १३ पैकी सात खासदारांचे भाजपाने तिकीट कापायला लावले. अद्याप कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर करू शकले नाहीत. शिवसेना आम्ही पुढे घेऊन जाणार असे म्हणणाऱ्यांना डबल देखील जागा जाहीर करता येत नाहीत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे गट शिवसेनेचे युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी शिंदे गटावर टीका केली आहे.
सध्याचा ट्रेंड पाहता नावाची घोषणा झाल्यानंतर देखील तिकीट कापले जात आहे. त्यामुळे कल्याण लोकसभेचे विद्यमान खासदारांना देखील शंका असेल की माझ्या सोबत असे होईल. यामुळेच कदाचित त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जात नाही. कल्याण लोकसभेत भाजप आणि शिवसेनेने सर्व्हे केला. हा केलेला सर्व्हे निगेटिव्ह असल्याने श्रीकांत शिंदे यांच्या नावाची शिवसेनेकडून अधिकृत घोषणा होत नाही, अशी टीका सरदेसाई यांनी केली आहे.
डोंबिवलीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची वरून सरदेसाई यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर देखील उपस्थित होत्या. उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य जनतेतील वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिल्याने लोकसभा मतदारसंघात चांगला संदेश दिला आहे, असे सरदेसाई म्हणाले.
शिवसेना शिंदे गटाच्या सात खासदारांचे तिकीट कापले गेले, यावर सरदेसाई यांनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडले आहे. एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या 13 पैकी सात खासदारांची तिकीटे कापली गेली. हा नियतीचा खेळ आहे. त्यांना पश्चाताप होत असेल. उद्धव ठाकरे, मातोश्रीची आठवण येत असेल. 2014, 2019 साली या सगळ्या उमेदवारांना मातोश्रीवर बोलावले गेले होते. स्वतः ठाकरे कुटुंब उपस्थित असायचे. रश्मी ठाकरे औक्षण करून यांना एबी फॉर्म द्यायच्या. आता दहा दहा तास वेटिंग करावे लागते त्यानंतर देखील तिकीट मिळत नाही, असा टोला सरदेसाई यांनी शिंदे गटाला लगावला.
मातोश्रीवर मिळणारा मान आणि आत्ताच त्यांचे स्थान हे चित्र डोळ्यांसमोर येऊन सगळ्यांना जाणीव झाली असेल. शिवसेना आम्ही पुढे घेऊन जाणार, असे म्हणणाऱ्यांना डबल देखील जागा मिळवता येत नाहीत. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांनी 21 उमेदवारांची घोषणा केली आहे, अशा शब्दांतही दोन्ही गटांतील फरक सरदेसाईंनी मांडला.