एक लाख फॉलोअर्स तरच तिकीट
By admin | Published: July 29, 2016 01:43 AM2016-07-29T01:43:23+5:302016-07-29T01:43:23+5:30
फेसबुक, टिष्ट्वटरवर तुमचे एक लाखापेक्षा अधिक फॉलोअर्स असतील तर तुमचा खासदारकी, आमदारकीच्या निवडणुकीसाठी प्राधान्याने विचार केला जाईल आणि तोही भाजपामध्ये.
मुंबई : फेसबुक, टिष्ट्वटरवर तुमचे एक लाखापेक्षा अधिक फॉलोअर्स असतील तर तुमचा खासदारकी, आमदारकीच्या निवडणुकीसाठी प्राधान्याने विचार केला जाईल आणि तोही भाजपामध्ये. सोशल मीडियात आपल्या आमदार, खासदारांना सक्रिय करण्यासाठी पक्षामध्ये आता हा फंडा वापरण्यात येत आहे.
भाजपाच्या राज्यातील सर्व आमदारांची बैठक गुरुवारी रात्री मंत्रालयासमोरील महिला विकास महामंडळाच्या सभागृहात झाली. त्यात प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी याबाबतची माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री व्ही. सतीश यांनीही बैठकीत मार्गदर्शन केले.
भाजपाच्या खासदार, आमदारांना सोशल मीडियामध्ये किती फॉलोअर्स आहेत याचे मूल्यांकन केले जात आहे. त्यांच्यापैकी किती जणांनी ‘नमो’ अॅप आपल्या मोबाइलमध्ये आतापर्यंत डाऊनलोड केले याची माहिती मागविण्यात आली आहे.
मध्यंतरी महाराष्ट्रातील
एका खासदाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर दोन वर्षांतील
कार्याचा आढावा मांडला. तेव्हा
‘तुम्ही सोशल मीडियावर अजिबात अॅक्टीव्ह का नाही?’, असा जाब मोदी यांनी त्या खासदारास विचारल्याचे समजते.
केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना आणि त्यांचे फायदे सामान्यांपर्यंत पोहोचविण्यात आमदारांचे योगदान कमी पडत असल्याची जाणीव गुरुवारच्या बैठकीत करून देण्यात आली. या कामासाठीच्या आपल्या योगदानाचेही मूल्यांकन केले जात आहे, असे त्यांना बजावण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जिंकण्यासाठी ‘करा किंवा मरा’च्या इर्षेने कामाला लागण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी या बैठकीत दिले. या यशापयशाचा हिशेब करून मार्च २०१७मध्ये कोणत्या आमदारास कोणती संधी द्यायची हे ठरविले जाईल, असेही सूचित करण्यात
आले. (विशेष प्रतिनिधी)