तुकोबांचा पालखी रथ आषाढी वारीसाठी सज्ज
By admin | Published: June 6, 2017 05:12 AM2017-06-06T05:12:27+5:302017-06-06T05:12:27+5:30
श्री संत तुकाराम महाराजांच्या ३३२व्या पालखी सोहळ्यासाठी जगद्गुरू श्री संत तुकाराममहाराजांचा पालखीचा रथ सज्ज झाला आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
देहूगाव (जि. पुणे) : श्री संत तुकाराममहाराजांच्या ३३२ व्या पालखी सोहळ्यासाठी जगद्गुरू श्री संत तुकाराममहाराजांचा पालखीचा रथ सज्ज झाला आहे. नव्याने एलईडी विद्युत रोषणाई, छताचे वॉटर प्रुफ्रिंगसह दुरुस्ती-देखभाल करून रथ सोमवारी देहूत दाखल झाला आहे.
श्री संत तुकाराममहाराजांच्या पालखीसोबत भाविकांचा व वारकऱ्यांचा वारीतील सहभाग वाढला असल्याने त्या प्रमाणे सोयी सुविधाही वाढल्या आहेत. संत तुकाराममहाराजांच्या पादुकांसाठी चांदीची नवी पालखी तयार करण्यात आली. मात्र, त्यात वेळोवेळी बदल होत गेला. पंढरपूरपर्यंतचे सुमारे अडीचशे किलोमीटरचे अंतर जड पालखीसह पार करणे सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य नसल्याने पालखी रथ तयार करण्यात आला. बदलत्या काळानुसार वारीही हायटेक झाली. पालखी रथातही सुविधा विकसित करण्यात आल्या. त्याच बरोबर रथाची दुरुस्ती देखभालही महत्त्वाची ठरली. गेल्या काही वर्षापासून पालखी रथाच्या दुरुस्ती देखभालीचे काम खडकी येथील संरक्षण विभागाच्या ५१२ आर्मी बेस वर्कशॉपचे कामगार स्वच्छेने श्रद्धापूर्वक करत आहेत. रथावरील चारही कॅमेऱ्यांची आणि जीपीआरएस व्यवस्थेची तपासणी करण्यात आली आहे.
पालखी रथाचे सर्व काम ५१२ आमीर्बेस वर्कशॉपमधील कामगारांनी सेवाभावीवृत्तीने केले आहे.
- अभिजित मोरे,
पालखी सोहळा प्रमुख.