चिवचिवाट झालाय दुर्मीळ
By admin | Published: April 28, 2016 02:13 AM2016-04-28T02:13:52+5:302016-04-28T02:13:52+5:30
मावळ तालुका पर्यटनस्थळे व निसर्गरम्यतेमुळे प्रसिद्ध आहे. मात्र, वाढत्या नागरीकरणामुळे तालुक्यातील पक्ष्यांचे प्रमाण कमी झाले आहे. शहरात तर चिमण्यांचा चिवचिवाट हरवल्यासारखाच आहे.
करंजगाव : मावळ तालुका पर्यटनस्थळे व निसर्गरम्यतेमुळे प्रसिद्ध आहे. मात्र, वाढत्या नागरीकरणामुळे तालुक्यातील पक्ष्यांचे प्रमाण कमी झाले आहे. शहरात तर चिमण्यांचा चिवचिवाट हरवल्यासारखाच आहे.
तालुक्यातील डोंगरदऱ्यांत साग, बाभूळ, भेंडी, बोर, कलक, बांबू, आंबा, चिंच, जांभूळ, नीलगिरी आदी झाडे आहेत. गेल्या काही वर्षांत डोंगरदऱ्या मध्येही बंगले, फार्महाऊस बांधण्यात आले आहेत. मानवी वावर वाढल्याने आणि पर्यावरणाची काळजी न घेतल्याने अनेक ठिकाणी निसर्गाचा ऱ्हास होताना दिसत आहे. वाढलेल्या सिमेंटच्या जंगलामध्ये मोबाइल टॉवरची गर्दी दिसत आहे. काही टॉवर हे घराच्या स्लॅबवर आहेत. मोबाइल टॉवरमुळे चिमण्यांचे प्रमाण कमी झाले आहे.
पूर्वी घरांमधील आजोबा, पणजोबांसह देवदेवतांचे फोटो लावलेले असायचे. त्यांच्या मागे चिमण्या घरटी करून राहत. पण, आता काँक्रिटच्या भिंतींमुळे चिमण्यांना घरटी करायला चांगली जागाच मिळत नाही.
आता या संस्कृतीचे दर्शनही दुर्लभ होत आहे. मोबाइल टॉवरपासून इमारतीच्या मालकास दरमहा चांगले उत्पन्न मिळते. मात्र, त्यामुळे निष्पाप चिमण्यांचा बळी जात आहे. चिमण्या व इतर पक्ष्यांचे प्रमाण कमी झाले असून, काही ठिकाणी तर क्वचित एखादी चिमणी दिसते. पूर्वी शेतामध्ये धान्य असायचे. तेथे चिमण्यांचे थवे असायचे. धान्य काही ठिकाणी अळ्या, किडे खायला मिळायचे. आता प्लॅस्टिकच्या पिशवीतून धान्य येत असल्यानं चिमण्यांची उपासमार होऊ लागली आहे. शिवाय, मोबाइल टॉवरमधून निघणाऱ्या लहरींमुळे चिमण्या मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत.
चिमण्यांवर प्रेम असल्याने त्यांच्याबद्दल सर्वांना चिंता आहे, असे नरेंद्र मोदी विचार मंचाचे संस्थापक शैलेंद्र रावळ, केदार शिरसाट,
नवनाथ नाणेकर, अतुल दाभणे, विलास देवराम गायकवाड, कुणाल गिरंजे, अभिजित ठकले, सुधीर गायकवाड यांनी सांगितले.
प्रत्येकाने अंगणात चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी बसवावी, असे आवाहन ग्रामपंचायत सदस्य शंकर काजळे यांनी केले आहे. (वार्ताहर)