आंतरराष्ट्रीय शिकाऱ्यांच्या निशाण्यावर भारताचे वाघ !

By admin | Published: September 6, 2016 06:44 PM2016-09-06T18:44:06+5:302016-09-06T18:44:06+5:30

जगात १३ देशांत वाघांचे अस्तित्व असले तरी भारताचे वाघ हे आंतरराष्ट्रीय निशाण्यावर आहेत.

Tigers on the target of international hunters! | आंतरराष्ट्रीय शिकाऱ्यांच्या निशाण्यावर भारताचे वाघ !

आंतरराष्ट्रीय शिकाऱ्यांच्या निशाण्यावर भारताचे वाघ !

Next

गणेश वासनिक/ऑनलाइन लोकमत

अमरावती, दि. 6 - जगात १३ देशांत वाघांचे अस्तित्व असले तरी भारताचे वाघ हे आंतरराष्ट्रीय निशाण्यावर आहेत. दरवर्षी १०० पेक्षा अधिक वाघांची शिकार होत असल्याची धक्कादायक माहिती राष्ट्रीय व्याघ्र संर्वधन प्राधिकरणाने दिली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्याघ्र तस्करीच्या बाजारपेठेवर कोणत्याही देशाचा अंकुश नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.

सन २००० ते २०१४ या दरम्यान जगातल्या १३ देशांपैकी ११ देशांत वाघ अवयवांच्या तस्करीच्या हजारो घटना घडल्या आहेत. चीन, थायलंडमध्ये टायगर फार्म हाऊस असून अन्य ११ देशांपैकी भारतात जंगल आणि नैसर्गिक सान्निध्यात वावरणारे वाघांचे संवर्धन, संरक्षण केले जाते. जगात एकूण वाघ संख्येपैकी निम्मे वाघ एकट्या भारतात असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर वाघ तस्करांनी भारतातील वाघांना लक्ष्य केले आहे.

तसेच सर्वाधिक व्याघ्र प्रकल्पही भारतात असल्याची नोंद आहे. वाघ अवयवांची आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारी तस्करी रोखण्यासाठी भारताने सेंट पिटर बर्ग येथे पार पडलेल्या पहिल्या जागतिक व्याघ्र परिषदेत टायगर फार्म हाऊसला कडाडून विरोध केला होता. टायगर फार्म हाऊसच्या नावाखाली वाघांची शिकार, आंतरराष्ट्रीय पातळीवर वाघ अवयवांची तस्करी आदी बाबींमुळे वाघ नामशेष होण्याची भीती वर्तविली होती. वाघांचे संवर्धन हे जंगल आणि नैसर्गिकरीत्या होणे अत्यावश्यक असल्याचा मुद्दा या परिषदेत भारताने प्रामुख्याने मांडला होता.

त्यानंतर या परिषदेत सन २०२२ पर्यंत वाघांची संख्या वाढविण्याचे धोरण आखले गेले. त्याअनुषंगाने भारताने व्याघ्र संवर्धनात आघाडी घेतली आहे. तथापि चीन, नेपाळ, पाकिस्तानातून आंतरराष्ट्रीय वाघ अवयवांची स्थानिकांना हाताशी धरून तस्करी होत असल्याचे सीबीआयने यापूर्वीच वाघ शिकारप्रकरणी केंद्र सरकारला पाठविलेल्या अहवालातून स्पष्ट केले आहे. भारताच्या व्याघ्र संवर्धनात सर्वाधिक बंगाली प्रजातींचे वाघ असून त्यांच्या अवयवांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी मागणी आहे. देशात दरवर्षी १०० पेक्षा जास्त वाघांची शिकार होत असताना ही बाब जागतिक स्तरावर ठोसपणे मांडली जात नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर एका वाघाच्या शिकारीसाठी स्थानिकांना मिळणारे ४० ते ५० लाख रुपये हे त्यांच्यासाठी रोजगाराचे साधन झाले आहे.

वाघांच्या अस्तित्वाची इत्यंभूत माहिती गोळा करून नियोजन पद्धतीने शिकार करणे, त्यानंतर वाघ अवयवांची आंतरराष्ट्रीय तस्करी करण्यात काही स्थानिकांचा हातखंडा आहे. दिल्ली, बंगळूर, चेन्नई, कोलकाता, जयपूर, हैद्राबाद, मध्यप्रदेशातील कटनी तसेच नागपूर हे वाघ अवयव तस्करीचे प्रमुख केंद्र बनले आहेत. नेपाळ, भुतानमार्गे आणि पाकिस्तानातून सीमेपार वाघ अवयवांची तस्करी होत असल्याचे जवळपास सिद्ध झाले आहे. अमेरिका, चीन या दोन देशांत भारतातील वाघ अवयवांची तस्करी होत असून ही बाब आंतरराष्ट्रीय व्याघ्र परिषदेतही चर्चिली गेली. आंतरराष्ट्रीय व्याघ्र तस्करी रोखण्यासाठी भारताने पुढाकार न घेतल्यास देशातील वाघांची संख्या झपाट्याने कमी होईल, अशी भीती वन्यजीवप्रेमींनी वर्तविली आहे.

वाघ तस्करीची आंतरराष्ट्रीय बाजारपेठ कायम असल्यामुळे वाघांचे संगोपन, संवर्धन करणे आता दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. ज्या देशात वाघांचे अस्तित्व आहे, त्या देशांनी यासाठी पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे. विशेषत: भारतासाठी आंतरराष्ट्रीय व्याघ्र तस्करी ही मोठी समस्या ठरत आहे.
- दिनेश त्यागी,
क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प

या देशात आहे वाघांचे अस्तित्व
जगात १३ देशांत वाघांचे अस्तित्व आहे. यात रशिया, चीन, भारत, बांग्लादेश, भूतान, कम्बोडिया, व्हियतनाम, इंडोनेशिया, मलेशिया, म्यानमार, थायलंड, नेपाळ, लासा या देशांचा समावेश आहे.

व्याघ्र संवर्धनातील कर्मचाऱ्यांकडे निकामी शस्त्रे
भारतात एकूण ३९ व्याघ्र संवर्धन प्रकल्प आहेत. सन २०१४ साली झालेल्या व्याघ्र गणनेत देशात २,२२६ वाघांची नोंद करण्यात आली आहेत. भारताचे वाघ हे आंतरराष्ट्रीय तस्करांच्या निशाण्यावर आहेत. स्थानिक व्याघ्र तस्करांना आंतरराष्ट्रीय तस्कर अद्ययावत शस्त्रसाठा पुरवित असल्याची विश्वसनीय माहिती आहे. त्यामुळे व्याघ्र संवर्धनातील कर्मचाऱ्यांक डे सोपविलेली निकामी शस्त्रे बघता ते कदापिही तस्करांचा मुकाबला करू शकत नाही, हे वास्तव आहे.

Web Title: Tigers on the target of international hunters!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.