विदर्भातील वाघांना ‘कॉरिडोर’ची गरज
By Admin | Published: September 17, 2015 01:24 AM2015-09-17T01:24:51+5:302015-09-17T01:24:51+5:30
विदर्भातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची संख्या वाढली असून हे वाघ संरक्षित क्षेत्राबाहेर पडत असल्याने त्यांना ‘कॉरिडोर’ची गरज भासू लागली आहे. काही दिवसांपूर्वी बोर
- गणेश वासनिक, अमरावती
विदर्भातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची संख्या वाढली असून हे वाघ संरक्षित क्षेत्राबाहेर पडत असल्याने त्यांना ‘कॉरिडोर’ची गरज भासू लागली आहे. काही दिवसांपूर्वी बोर अभयारण्यातून स्थलांतरित झालेल्या दोन वाघांचा अद्यापही शोध लागलेला नाही.
विदर्भात मेळघाट, ताडोबा, पेंच व्याघ्र प्रकल्पासह बोर, टिपेश्वर अभयारण्यात वाघ, बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, व्याघ्र प्रकल्प म्हणजेच संरक्षित क्षेत्राबाहेर वाघांचे अस्तित्व दिसून येत असल्याने वन्यजीव विभागासाठी ती चिंतेची बाब आहे. मागील पाच वर्षांत देशात १,७०० वाघांची नोंद होती. व्याघ्रगणनेनंतर आता ३,५१० वाघ असल्याचे स्पष्ट झाले आहे. अमरावतीच्या मालखेड, पोहरा तर धुळे जिल्ह्यात संरक्षित क्षेत्राबाहेर पट्टेदार वाघांचे अस्तित्व असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए) दरवर्षी भारतीय वन्यजीव संस्थेमार्फत देशातील ३९ व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची प्रगणना करते. त्यानुसार विदर्भात वाघांची संख्या वाढली असली तरी व्याघ्र प्रकल्पाबाहेर संरक्षित क्षेत्र वगळून त्यांचे अस्तित्व दिसून येत आहे. त्यामुळे वाघांचे ‘कॅरिडोर’ निर्माण झाल्यास एका जंगलातून दुसऱ्या जंगलात त्यांना संचार करता येणार आहे. मेळघाट ते अकोट, पोहरा, मालखेड तर पेंच ते बोर पुढे मालखेड, पोहरा असा ‘कॉरिडोर’ निर्माण केल्यास वाघांचे संरक्षण होऊ शकेल. वर्धा जिल्ह्यातील बोर अभयारण्यातून यापूर्वी एक वाघ स्थलांरित झाला होता. पोहरा, मालखेड जंगलात अस्तित्व दिसले होते. त्यानंतर बोर अभयारण्यातून दोन वाघांचे स्थलांतरण झाले. ते कोणत्या जंगलात गेले, हे अद्याप वनविभागाने स्पष्ट केलेले नाही.
काही दिवसांपूर्वी पोहरा, मालखेड जंगलात बोर अभयारण्यातून वाघ आल्याचे स्पष्ट झाले होते. पुन्हा दोन वाघ बोर अभयारण्यामधून स्थलांतरित झाल्याची माहिती आहे, मात्र त्यांचे अस्तित्व सिद्ध झाले नाही. संरक्षणाच्या दृष्टीने उपाययोजना आखल्या जात आहेत.
- नीनू सोमराज, उपवनसंरक्षक, अमरावती