तुकोबाची पालखी निघाली पंढरपूरला!
By Admin | Published: June 28, 2016 03:43 AM2016-06-28T03:43:57+5:302016-06-28T03:43:57+5:30
विणेच्या अखंड झंकारात, ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा जयघोष करीत संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीने सोमवारी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.
श्रीक्षेत्र देहूगाव : टाळ-मृदंगाचा गजर करीत, भगव्या पताका नाचवत... विणेच्या अखंड झंकारात, ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा जयघोष करीत संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीने सोमवारी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. या ३३१व्या पालखी सोहळ्यात राज्याच्या कोनाकोपऱ्यातून वारकरी सहभागी झाले आहेत. मंगळवारी माऊलींची पालखी आळंदीतून प्रस्थान ठेवणार असून आता अवघा मऱ्हाटी मुलूख आषाढी एकादशीपर्यंत भक्तीरसात चिंब भिजून जाणार आहे.
तुकोबारायांच्या नगरीला विठ्ठलभेठीची आस लागलेली होती. पहाटे मुख्य मंदिरात, तसेच शिळा मंदिरात पालखीसोहळाप्रमुख अशोक नि. मोरे, विश्वस्त अभिजित मोरे यांच्या हस्ते महापूजा झाली. त्यानंतर सहाला श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सुनील दा. मोरे यांच्या हस्ते, तर पालखीसोहळ्याचे जनक तपोनिधी नारायणमहाराज समाधी मंदिरातील महापूजा अशोक बा. मोरे, जालिंदर मोरे यांच्या हस्ते, वैकुंठस्थान मंदिरातील महापूजा संस्थानाचे अध्यक्ष शांताराम मोरे यांच्या हस्ते झाली. महापूजेनंतर मुख्य मंदिरातील दर्शनबारी सुरू झाली.
इनामदारवाड्यात तुकोबांच्या पादुका आणण्यात आल्या. तिथे दिलीपमहाराज गोसावी, प्रीती गोसावी यांनी पादुकांची पूजा केली. त्यानंतर या पादुका मानकरी गंगा म्हसलेकर यांच्याकडे देण्यात आल्या. त्यानंतर परंपरेप्रमाणे म्हसलेकरांनी पादुका डोक्यावर घेऊन वाजत-गाजत मुख्य मंदिरातील भजनी मंडपात आणल्या. अडीचच्या सुमारास बाभूळगावकर आणि अकलूजच्या मोहिते-पाटलांचा अश्व मंदिराच्या आवारात आला. टाळ-मृदंगाचा एकच गजर सुरू झाला. दुसरीकडे वीणा मंडपात प्रस्थान सोहळ्यास सुरुवात झाली. फुगड्या, खेळ रंगले. टिपेल्या पोहोचलेल्या ज्ञानोबा-तुकारामाच्या जयघोषात मंदिर प्रदक्षिणा करून सायंकाळी पाचच्या सुमारास पालखीसोहळा पंढरीकडे मार्गस्थ झाला. इनामदारवाड्यात पालखी मुक्कामी असणार असून, मंगळवारी सकाळी सोहळा आकुर्डीकडे मार्गस्थ होणार आहे. (प्रतिनिधी)
>विठ्ठल-रुक्मिणी मंदिर कर्मचाऱ्यांचे उपोषण
पंढरपूर : आषाढी यात्रा तोंडावर आली असताना सहावा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तत्कालीन जिल्हाधिकारी दीपक कपूर यांनी ८ आॅक्टोबर १९९९ मध्ये मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांना चौथा आयोग लागू केला होता. पुढील वेतन आयोग नियमाने क्रमप्राप्त असतानाही मंदिर समितीचे अध्यक्ष शशिकांत पागे, आण्णासाहेब डांगे यांनी तो लागू केला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी मंदिरात मंत्र्यांंना निवेदन दिले. तसेच १४ जून २०१५ रोजी कर्मचाऱ्यांनी शिवाजी चौकातच बेमुदत आंदोलन सुरु केले होते. त्यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी शिवाजी कादबाने यांनी पाच वर्षांपेक्षा अधिक काळ सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत सामील करून घेण्याचे लेखी आश्वासन दिले, परंतु त्यांची अंमलबजावणी केली नाही. यामुळे कर्मचाऱ्यांनी सोमवारी शिवाजी चौकात उपोषण सुरु केले आहे. आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, संभाजी ब्रिगेड या संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
प्रमुख मागण्या
मंदिरातील कर्मचाऱ्यांना शासनाच्या स्थायी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी लागू करणे.
२० एप्रिल २०१५ रोजीचे आ. अप्पर कामगार आयुक्त, पुणे विभाग, पुणे यांच्या कार्यालयीन पत्राची अंमलबजावणी करणे.
मंदिर समितीच्या बैठकीतील ठराव क्र. ५(१) व ५(२) ची पूर्तता करणे.
माऊलींचे
आज प्रस्थान
श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या १८६ व्या आषाढी पायीवारी सोहळा उद्या (मंगळवार) प्रस्थान ठेवणार आहे. विठूमाऊलींची आस लागलेले लाखो वैष्णवजण या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आळंदीत दाखल झाले आहेत. इंद्रायणीतीरी दिवसभर फेर, फुगड्या, नामघोष करून वारकरी प्रस्थानपूवीचा मनसोक्त आनंद लुटताना दिसत आहेत.