MPSC exam postponed : 'एमपीएससी'ची परीक्षा नियोजित वेळेत होणार की पुढे ढकलली जाणार? विद्यार्थ्यांमध्ये 'धकधक'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2020 07:27 PM2020-10-01T19:27:28+5:302020-10-01T19:29:24+5:30
MPSC exam postponed : मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विविध संघटना व लोकप्रतिनिधी यांनी केली आहे.
पुणे : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने समाजाचा उद्रेक बाहेर पडू लागला आहे. ठिकठिकाणी मोर्चे, आंदोलने करण्यात येत आहेत. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणी करण्यात येत आहे. यामुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता आहे.
मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने एमपीएससीची परीक्षा MPSC Exam Postponed पुढे ढकलण्याची मागणी विविध संघटना व लोकप्रतिनिधी यांनी केली आहे. अधिकृत संकेतस्थळावर परीक्षा प्रवेश पत्र उपलब्ध करण्यात आले आहे. त्यामुळे सतत बदलत्या तारखांच्या खेळात अडलेली राज्य सेवा पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबरला होणार याची खात्री विद्यार्थ्यांना आली आहे. मात्र परीक्षा पुढे ढकलण्याची मागणीमुळे परीक्षा पुन्हा या वादात अडकणार की नियोजित वेळेत होणार , असा संभ्रम विद्यार्थ्यांच्या मनात आहे. परीक्षेची जाहिरात मराठा आरक्षणानुसार आली होती. परंतु आता आरक्षणाला स्थगिती भेटली आहे; मग हे आरक्षण या परीक्षेसाठी लागू आहे का, याबाबत विद्यार्थ्यांच्या मनात प्रचंड संभ्रम आहे. तरी याबाबत आयोगाने व सरकारने परिपत्रक काढून खुलासा करणे गरजेचे आहे अशी मागणी विद्यार्थी करू लागले आहेत.
कोरोनाने आधीच आर्थिक कंबरडे मोडलेले असताना कसेबसे दिवस काढत रात्रंदिवस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड सुरू आहे. अशा कारणांमुळे परीक्षा नेहमीच पुढे ढकलल्या जाऊ लागल्या अथवा दिरंगाई होत राहिली तर तरुणांचे एक ना एक दिवस मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता आहे. तसेच त्यांचे भविष्य धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती जाणकारांनी व्यक्त केली आहे.
....
परीक्षा पुढे ढकली तर पुढच्या वर्षीचे आर्थिक नियोजन ढासळणार आहे. तीन वेळा परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने मानसिक ताण वाढला असून आर्थिक नुकसान होत आहे. आरक्षणाबाबत जो काही निर्णय होईल तो परीक्षा झाल्यानंतर लागू करण्यात यावा. मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना खात्री द्यावी. जेणेकरून अभ्यास शांतपणे करता येईल.
- वैभव गाजरे पाटील, स्पर्धा परीक्षार्थी .
.................
आरक्षणाच्या चौकटीत एमपीएससीची परीक्षा अडकून ठेऊ नये. परीक्षा झाल्यावरही यावर निर्णय घेता येईल. मुख्यमंत्र्यांनी एसी मधून बाहेर पडून खरी परिस्थिती जाणून घ्यावी. विद्यार्थ्यांना सामोरे जावे. केवळ एका ठिकाणी बसून विद्यार्थ्यांचे प्रश्न समजणार नाहीत. आमच्या भविष्याशी खेळू नये.
पृथ्वीराज जाधव, स्पर्धा परीक्षार्थी.