३१ मेपर्यंत राज्य खड्डेमुक्त
By admin | Published: April 7, 2016 02:52 AM2016-04-07T02:52:07+5:302016-04-07T02:52:07+5:30
राज्यातील ९० हजार ५३२ किलोमीटरचे रस्ते येत्या ३१ मे पर्यंत खड्डेमुक्त करण्यात येतील, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत केली
मुंबई : राज्यातील ९० हजार ५३२ किलोमीटरचे रस्ते येत्या ३१ मे पर्यंत खड्डेमुक्त करण्यात येतील, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत केली, तसेच महामार्गांवर शौचालये, प्रथमोपचार केंद्रे, महिला बचत गटांचे स्टॉल एकाच ठिकाणी असलेली ४०० सुविधा केंद्रे उभारण्यात येतील, असे ते म्हणाले.
सा.बां. खात्याच्या अर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. पाटील पुढे म्हणाले की, ‘आघाडी सरकारच्या शेवटच्या वर्षात बांधकाम विभागासाठी २९०० कोटी रुपयांची तरतूद होती. मागील वर्षी आमच्या कार्यकाळात ती ३८०० कोटींवर गेली आणि यंदा ४ हजार कोटी रुपये मिळाले आहेत. योजनेवरील खर्च गृहित धरता, ती १० हजार कोटी रुपये इतकी आहे.’ ग्रामीण विकास खात्यातूनही स्वतंत्र रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये रस्त्यांची कामे समाविष्ट केली जाणार आहेत, तसेच यंदा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक विभागाने तब्बल २२ हजार किमीचे राज्यातील रस्ते ताब्यात घेतले असून, त्याची बांधणी केंद्राच्या निधीतून करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. येत्या तीन वर्षांत प्रत्येक रेल्वे फाटकाच्या ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल बांधला जाईल, असे पाटील
यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील
यांनी बांधकाम विभागाचे निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी यांच्यावर निशाणा साधला. कुलकर्णी यांनी काय-काय केले, याची सगळी माहिती आपल्याकडे आहे. त्यांच्या कार्यकाळात निलंबितांना लगेच कामावर घेण्यात आले, मनमानी बदल्या करण्यात आल्या, असे सांगत त्यांनी काही उदाहरणे दिली. चंद्रकांत पाटील साधे आहेत, पण कुलकर्र्णींनी बरेच काही केले, असे ते म्हणाले.
यावर, ‘कुलकर्णी हे अतिशय कार्यक्षम अधिकारी होते. आमच्या सरकारमध्ये या खात्यात ११०० बदल्या आणि १५०० अधिकाऱ्यांची पदोन्नती झाली, हा विक्रम आहे. कुलकर्णी केवळ प्रस्ताव द्यायचे, पण निर्णय मी आणि मुख्यमंत्र्यांनी मिळून घेतले आणि ते अतिशय पारदर्शक होते,’ या शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांचे आरोप फेटाळले.