उक्षीतील शेतकऱ्याच्या मुलाची चंदेरी पडद्यावर मशागत

By Admin | Published: May 28, 2015 10:23 PM2015-05-28T22:23:06+5:302015-05-29T00:08:39+5:30

चित्रपटसृष्टीत प्रवेश : शेताकडून झगमगत्या दुनियेकडे जातानाची वाटचाल

Till the child of a baked farmer, on the silver screen | उक्षीतील शेतकऱ्याच्या मुलाची चंदेरी पडद्यावर मशागत

उक्षीतील शेतकऱ्याच्या मुलाची चंदेरी पडद्यावर मशागत

googlenewsNext

शोभना कांबळे -रत्नागिरी --तालुुक्यातील उक्षी गावातील सुधीर घाणेकर या तरूणाने मुंबईत राहून प्रतिकूल परिस्थितीत रात्रीचे शिक्षण घेत आपल्या अभिनयाची आवड जोपासत चंदेरी पडद्यावर प्रवेश केला आहे.
उक्षी बनाची वरचीवाडी येथील गणपत घाणेकर यांचा मुलगा. गणपत हे शेतकरी. सुधीरचे दहावीपर्यंतचे शिक्षण पोचरी येथील वामन गोविंद पटवर्धन हायस्कूलमध्ये झाले. पुढे गाव विकास मंडळाने मदतीचा हात पुढे केल्याने मुंबईतील दयानंद कॉलेज, परेल येथे महाविद्यालयीन शिक्षण घेण्याची संधी मिळाली. महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच सुधीरच्या अभिनयाचे पैलू उलगडत गेले. तसं गावामध्ये असताना सुधीर नमन, जाखडी यामधून आपल्या अभिनयाचे दर्शन घडवत होताच.
कॉलेजमध्ये गेल्यावर तर अधिकच संधी मिळाली. कॉलेजमध्ये दरवर्षी दयानंद महोत्सव होत असे. त्यामधून भाग घेत सुधीरचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला. महाविद्यालयीन मित्रांचेही चांगलेच सहकार्य मिळाले.
विशेष म्हणजे दिवसा नोकरी करून सुधीर रात्रीच्या महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच आपली अभिनयाची आवड जोपासत होता.
कॉलेजमध्ये असतानाच पहिल्यांदाच एकांकिका स्पर्धेमध्ये भाग घेऊन कॉलेजचा ‘बेस्ट अ‍ॅक्टर’ झाला. त्याला ए. एच. रिझवी मेरिट स्कॉलरशीप मिळाली आणि उक्षी गावचाच हा छोटासा सुधीर महाविद्यालयात बंडू नावाने फेमस झाला. त्यानंतर त्याने विविध आॅडिशन्स देणे सुरूच ठेवले. यातूनच ‘इंडियन आयडॉल - ६’ या पर्वाच्या जाहिरातीसाठी त्याची निवड झाली. या जाहिरातीचा त्याला फायदा मिळाला आणि त्याला ‘फुंकर’ या मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. एक हजार मुलांमधून पाच मुलांची निवड करण्यात आली. त्यात आपला समावेश होता, असे त्याने सांगितले. या मराठी सामाजिक आशय असलेल्या सिनेमात तो एका टपोरी मुलाची पण वेगळी भूमिका साकारत आहे. त्याचा हा चित्रपट या महिनाभरात प्रदर्शित होणार आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच सुधीरने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. याचवर्षी त्याने बी. कॉम. पूर्ण केले आहे.
त्याला अभिनयातून करिअर करायचं आहे. त्याला निर्मितीपर्यंत पोहोचायचे आहे. यासाठी त्याची कितीही कष्ट करायची तयारी आहे. सध्या तो एकांकिका स्पर्धा, पथनाट्य यामधूनही काम करीत आहे.
या साऱ्या प्रवासात त्याची मित्रमंडळी, त्याचे कुटुंब यांच्या पाठिंब्यावरच त्याचा हा सर्व प्रवास होणार आहे. मुंबईसारख्या मायानगरीत राहूनही सुधीरची आपल्या मायभूमीबद्दलची ओढ कायम आहे. पुढील काळात गावात यासाठी तो विशेष लक्ष देणार आहे. (प्रतिनिधी)


रत्नागिरी तालुक्यातील उक्षीच्या मुलाने उभा केला नवा आदर्श.
रात्रीच्या महाविद्यालयात शिकून सुधीरने घडविले जिद्दीचे प्रदर्शन.
एकांकिका स्पर्धेत भाग घेऊन कॉलेजमध्ये बनला बेस्ट अ‍ॅक्टर.
या प्रवासात त्याला साथ मिळाली मित्रमंडळी, त्यांचे कुटुंबीय.
मायभूमिची ओढ कायम राहिलेय.

Web Title: Till the child of a baked farmer, on the silver screen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.