मराठीची श्रीमंती टिकवा
By admin | Published: September 19, 2016 12:44 AM2016-09-19T00:44:28+5:302016-09-19T00:44:28+5:30
ज्ञानेश्वरांपासून पुढे अनेक प्रतिभावंत साहित्यिक देणारा महाराष्ट्र यामध्ये गरीब होत चालला आहे.
पुणे : ज्ञानेश्वरांपासून पुढे अनेक प्रतिभावंत साहित्यिक देणारा महाराष्ट्र यामध्ये गरीब होत चालला आहे. राष्ट्र उभारणीसाठी शब्दांइतके मौल्यवान शस्त्र कुठलेही नाही. ज्यांच्याकडे बुद्धिमत्ता व प्रतिभा आहे, त्यांनी ही ताकद वाया जाऊ न देता लिहिते व्हावे. मराठीला गरीब होऊ देऊ नका, तिची श्रीमंती टिकवा, असे आवाहन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी रविवारी येथे केले.
मृत्युंजय प्रतिष्ठानच्या वतीने दिले जाणारे ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत स्मृती पुरस्कारांचे वितरण पुरंदरे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. नागपूर येथील डॉ. रवींद्र शोभणे यांना साहित्य पुरस्कार तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांना समाजकार्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा मृणालिनी सावंत आणि कार्यकारी विश्वस्त डॉ. सागर देशपांडे व्यासपीठावर होते.
शब्द हे शस्त्र आणि रत्न असल्याचे सांगून बाबासाहेब पुरंदरे म्हणाले, ‘‘शब्दांचा संसार मांडणारे लेखक, साहित्यिकांची ताकद राष्ट्र उभारणीसाठी मौल्यवान आहे. या शब्दांचा शस्त्राइतका उपयोग केलेली माणसे दिसतात. मात्र, डोळ्यादेखत काही माणसे वाया गेलेली पाहिली आहेत. भाषेच्यादृष्टीने आपण नक्कीच श्रीमंत आहोत. शब्दांनी श्रीमंती, शौर्य दिले आहे. या ताकदीचा उपयोग झाला पाहिजे. महाराष्ट्र विनाकारण गरीब होत चालला आहे. महाराष्ट्राने ज्ञानेश्वरांपासून माडगूळकर, शिवाजीराव सावंत असे अनेक साहित्यिक दिले. पण एवढीच सीमा आहे का?, अशी खंत व्यक्त करून पुरंदरे यांनी मराठीला इतके गरीब होऊ देऊ नका. मी तुमच्यापुढे मराठीच्या श्रीमंतीसाठी झोळी पसरतोय,
अशा शब्दांत कळकळीचे आवाहन केले.
डॉ. मुजुमदार यांनी ‘मृत्युंजय’ने अनेक पीडित, अन्यायग्रस्तांना धीर दिल्याचे सांगितले. तर ‘मृत्युंजय’मधील कर्णाने पारधी, वडार तसेच इतर पददलितांना अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिल्याचे प्रभुणे म्हणाले. वाचन संस्कृतीच्या शिडीची पहिली आणि अंतिम पायरी ‘मृत्युंजय’ असल्याचे डॉ. शोभणे यांनी नमूद केले. अमिताभ सावंत यांनी सूत्रसंचालन केले.
>ज्ञानाचे दरवाजे उघडायलाच हवेत
‘मृत्युंजय’ कादंबरीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त पुढील वर्षभर वाचन प्रसाराचे कार्य केले जाणार आहे. त्यामध्ये राज्यभर सुमारे ५० व्याख्याने तसेच निबंध स्पर्धा, परिसंवाद, मृत्युंजयचे अभिवाचन, सर्वभाषीय लेखांचा मेळावा असे विविध उपक्रम घेतले जाणार असल्याचे डॉ. देशपांडे यांनी सांगितले.शिवाजीमहाराजांनी लिहिलेल्या एका ३० शब्दांच्या पत्रात २० शब्द पर्शियन होते. आता ही जागा इंग्रजी घेणार की काय, अशी भीती वाटू लागली आहे. ज्ञानाचे दरवाजे उघडायलाच हवेत. त्यासाठी इंग्रजीही शिकणे गरजेचे आहे. पण मराठीकडेही दुर्लक्ष होता कामा नये, असे पुरंदरे यांनी नमूद केले. शिवाजीराव सावंत यांच्याविषयीच्या काही आठवणीही पुरंदरे यांनी सांगितल्या.