२०२० पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार
By admin | Published: May 1, 2017 03:42 AM2017-05-01T03:42:40+5:302017-05-01T03:42:40+5:30
आतापर्यंत जलयुक्त शिवार योजनेतून ५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली आहेत. पुढील वर्षी ११ हजार व २०२० पर्यंत पूर्ण राज्य
नवी मुंबई : आतापर्यंत जलयुक्त शिवार योजनेतून ५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली आहेत. पुढील वर्षी ११ हजार व २०२० पर्यंत पूर्ण राज्य दुष्काळमुक्त करण्यात येणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेरूळ येथील कार्यक्र मात दिली.
गुरूदेवजींच्या प्रोत्साहनामुळे शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेत आर्ट आॅफ लिव्हिंग संस्थेच्या माध्यमातून भरीव कार्य झाले आहे. निसर्गाचे शोषण झाल्याने सर्वत्र दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. स्वार्थामुळे निसर्गाचे आपण शोषण केले आहे. त्यामुळेच आता निसर्गाने आपल्याला देणे बंद केले आहे. यासाठी आता निसर्गाला देण्याची वेळ आली आहे. जगाला पू. गुरूदेवजींनी भारतीय संस्कृती व विचारांची नव्याने ओळख करून दिल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.
‘आर्ट आॅफ लिव्हिंग’ संस्थेचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांचे तीन दिवसांकरिता मुंबईत आगमन झाले होते. शुक्रवार, २८ ते रविवार, ३० एप्रिल दरम्यान मुंबई, तसेच नवी मुंबई परिसरात विविध कायक्रमांचे आयोजन केले होते. रविवारी सीवूड येथील गणपतशेठ तांडेल मैदानात महासत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील लाखो अनुयायी या महासत्संग सोहळ्यासाठी उपस्थित होते.
‘विज्ञान भैरव’ ग्रंथात काही अद्भुत व गूढ माहिती दिली आहे. हे अतिप्राचीन गूढ ज्ञान स्वयं श्री श्री रविशंकर यांनी सामान्य माणसांसाठी उपलब्ध करून दिले आहे. एनएससीआय मुंबई येथे झालेला हा कोर्स त्यांच्या भेटीचा मानबिंदू ठरला आहे. या कोर्समध्ये ध्यान, प्रश्नोत्तरे व विशेष कार्यशाळेचा समावेश होता. या वेळी युवा पिढीला श्री श्री रविशंकर यांच्यासोबत यशाचे रहस्य प्रश्नोत्तरांद्वारे जाणून घेण्याची सुवर्णसंधी मिळाली. या वेळी बोरखार आणि रानसई गावचा पाणीप्रश्न सोडवणाऱ्या उरणच्या शंकर निनावे या स्वयंसेवकाला सन्मानित केले़
या कार्यक्रमात आमदार मंदा म्हात्रे, आमदार प्रशांत ठाकूर, महापौर सुधाकर सोनावणे, नगरसेवक दीपक पवार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘आर्ट आॅफ लिव्हिंग’ ही संस्था जगातील १५५ हून अधिक देशांत कार्यरत आहे. कार्यक्र मातून जमा होणारा निधी महाराष्ट्रात राबविल्या जाणाऱ्या सामाजिक कामांसाठी वापरण्यात येईल. ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’तर्फे संपूर्ण महाराष्ट्रातील २२ सदस्यांचे पुनरुज्जीविकरण, ७००हून अधिक सार्वजनिक शौचालयांची बांधणी, ३० हजारांहून अधिक शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण, ७ मोफत शाळांमधून १,४१५ गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करून दिले जात आहे.
‘इन्फिनिटी’ हा कार्यक्र माचा मानबिंदू ठरला असून, हा कोर्स भारतात प्रथमच तेही मुंबईत श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते घेण्यात आला.
तीनही दिवशी ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’ संस्थेचे स्वयंसेवक कार्यक्र माच्या ठिकाणी कार्यरत होते. या वेळी गैरप्रकार होऊ नये, वाहतुकीत अडथळे होऊ नयेत, याकरिता शिस्तबद्ध पद्धतीने शहरात ठिकठिकाणी स्वयंसेवक कार्यरत होते. कार्यक्र म परिसरात स्वच्छतेचे भान ठेवत, स्वयंसेवकांमार्फत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. कार्यक्र मानंतरही परिसराची स्वच्छता करण्यात आली.
नैसर्गिक संपत्तीचे संवर्धन करू - मुख्यमंत्री
महाराष्ट्रातील नैसर्गिक संपत्ती जपण्याचा प्रयत्न सुरू असून, २०२०पर्यंत हे ध्येय पूर्ण करणार असल्याचे आश्वासन या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. श्री श्री रविशंकर यांनी या वेळी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास जागृत करून नैसर्गिक शेतीचे तंत्र रु जविणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत. याकरिता सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. झीरोबजेट शेतीचे तंत्रज्ञान शिकविणे आवश्यक असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
श्री श्री रविशंकर विश्वाचे ब्रँड अॅम्बेसिडर
श्री श्री रविशंकर यांचे काम अध्यात्मिक विचारांपर्यंत सीमित नाही, तर ते विचार आचरणात आणण्याचे काम ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’च्या माध्यमातून सुरू आहे. आपल्या कोट्यवधी अनुयायींना आध्यामिक ज्ञानसंपदा प्रदान करण्याचे, योग्य रस्ता दाखविण्याचे काम ब्रँड अॅम्बेसिडरच्या रूपाने श्री श्री रविशंकर करीत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.