... हा तर वेळकाढूपणा
By Admin | Published: April 6, 2017 05:10 AM2017-04-06T05:10:38+5:302017-04-06T05:10:38+5:30
शेतकरी कर्जमाफीचे मॉडल तपासायला उत्तरप्रदेश सरकार कोणाकडे गेले होते? हा तर निव्वळ वेळकाढूपणा आहे. कर्जमाफी कशी करायची
मुंबई : शेतकरी कर्जमाफीचे मॉडल तपासायला उत्तरप्रदेश सरकार कोणाकडे गेले होते? हा तर निव्वळ वेळकाढूपणा आहे. कर्जमाफी कशी करायची, याची माहिती राज्य सरकारला हवी असेल तर त्यांनी आम्हाला विचारावे. आम्ही सांगू कर्जमाफी कशी करायची, अशा शब्दात विरोधकांनी बुधवारी राज्य सरकारचा समाचार घेतला.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निवासस्थानी विरोधकांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. भाजपा उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांना ३६ हजार कोटी देते. मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांशीच यांचा ३६ चा आकडा का, असा सवाल करत विखे-पाटील यांनी युपी मॉडेलचा अभ्यास करण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयावर टीका केली. संघर्ष यात्रेबाबत बोलताना विखे पाटील म्हणाले की, संघर्ष यात्रेमुळे आपण सरकारला कर्जमाफी करण्यासाठी भाग पाडू शकतो, असा विश्वास शेतक-यांमध्ये निर्माण झाला आहे. दुस-या टप्प्यात संघर्ष यात्रा राजमाता जिजाबार्इंचे जन्मस्थान असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजापासून सुरू होईल. ही यात्रा १५ ते १८ एप्रिल दरम्यान चार दिवसात बुलडाणा, जळगाव, धुळे, नंदूरबार, नाशिक आणि पालघर जिल्ह्यांमधून मार्गक्रमण करणार आहे.
अजित पवार म्हणाले, सरकारने कर्जमाफीसाठी अभ्यास करण्याची सबब सांगू नये. सरकारची इच्छाशक्ती असेल तर कर्जरोखे काढूनही शेतकरी कर्जमाफी शक्य आहे. यापूर्वी सरकारने कृष्णा खो-यासाठी रोखे काढले होते, याची आठवण त्यांनी करून दिली. महाराष्ट्राच्या तुलनेत कमी आर्थिक क्षमता असलेले राज्य कर्जमाफीचे निर्णय घेतात. परंतु, येथील सरकारला शेतक-यांचे सोयरसूतकच राहिलेले नाही, असा ठपका त्यांनी ठेवला.
पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तर प्रदेश पॅटर्नवरील कर्जमाफी महाराष्ट्राला मान्य नसल्याचे म्हटले. उत्तर प्रदेशात केवळ एक लाख रूपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय झाला आहे. परंतु, महाराष्ट्रात अशी कोणतीही मयार्दा घालून कर्जमाफी स्वीकारली जाणार नाही, असे सांगितले. यावेळी , धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आदी नेते उपस्थित होते. (प्रतिनिधी)