सत्तेसाठी राष्ट्रवादीवर झगडण्याची वेळ

By admin | Published: February 20, 2017 01:31 AM2017-02-20T01:31:33+5:302017-02-20T01:31:33+5:30

बालेकिल्ल्यात काठावर पास होण्याची वेळ गेल्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसवर ओढवली होती. यंदा तर राज्यातील आणि केंद्रातील सत्तेच्या साथीने उतरलेली भारतीय जनता पार्टी

Time to fight against NCP for power | सत्तेसाठी राष्ट्रवादीवर झगडण्याची वेळ

सत्तेसाठी राष्ट्रवादीवर झगडण्याची वेळ

Next

विजय बाविस्कर / पुणे
बालेकिल्ल्यात काठावर पास होण्याची वेळ गेल्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसवर ओढवली होती. यंदा तर राज्यातील आणि केंद्रातील सत्तेच्या साथीने उतरलेली भारतीय जनता पार्टी, आक्रमक झालेली शिवसेना आणि कॉँग्रेसशी आघाडी करण्यात आलेले अपयश यामुळे सत्तेसाठी झगडण्याची वेळ राष्ट्रवादी कॉँग्रेसवर येणार आहे.
पुणे जिल्हा परिषदेत गेल्या वेळी ७५पैकी ४१ जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या होत्या. परंतु, गेल्या पाच वर्षांत तालुक्याची परिस्थिती बदलली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारी वाटपातील नाराजीमुळे अनेक खंदे समर्थक राष्ट्रवादीला सोडून गेले. त्यामुळे ज्या तालुक्यांमध्ये विरोधकांना फारसा आधार नव्हता, तेथेही ताकद निर्माण झाली. इंदापूर, पुरंदर, भोर या तालुक्यांत कॉँग्रेसचे संघटनात्मक काम असल्याने येथे राष्ट्रवादीला जास्तच झगडावे लागणार आहे. दौंड, खेडमध्ये विरोधी पक्षाचा आमदार असल्याने त्यांनीही लढत प्रतिष्ठेची केली आहे. त्यातच राष्ट्रवादीतील अंतर्गत नाराजीला भाजपाच्या सत्तेची उब मिळाल्याने कधी नव्हे, ती नाराजी उफाळून आली आहे.
२०१२मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत १३ जागा घेऊन शिवसेना दुसऱ्या तर ११ जागा घेऊन काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर होती. भाजपाला अवघ्या तीन जागा त्याही त्यांचा बाल्लेकिल्ला असलेल्या मावळ तालुक्यातच मिळाल्या होत्या. परंतु, भाजपाचा पाया आता विस्तारला आहे. दौंडमध्ये राहुल कुल, शिरूरमध्ये बाबूराव पाचर्णे हे भाजपाचे आमदार आहेत. पुरंदर आणि खेडमध्ये शिवसेना तर जुन्नरमध्ये मनसेने विधानसभेत यश मिळविले होते. त्यामुळे बसलेला फटका नगर परिषदेच्या निवडणुकीत दिसून आला होता. पालक मंत्री गिरीश बापट यांनी नगर परिषद निवडणुकांत सगळ्यांची मोट बांधून राष्ट्रवादीला दणका दिला होता. मुख्यमंत्र्यांनीही नगर परिषदांप्रमाणेच दौंड तालुक्यात सभा घेऊन जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला होता.
माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना विधानसभेतील पराभव जिव्हारी लागला आहे. त्यामुळे त्यांनी कॉँग्रेसची शिस्तबद्ध यंत्रणा राबविली आहे. आपल्या मातोश्रींनाच रिंगणात उतरवले आहे. शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूरमध्ये आपला पाया व्यापक करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
राष्ट्रवादीच्या विरोधकांची संख्या मोठी असली तरी ते विखुरलेले आहेत, ही गोष्ट राष्ट्रवादीला एका बाजूला पथ्यावर असली तरी दुसऱ्या बाजूला त्यामुळे अडचणीही वाढल्या आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नेतृत्व पक्षात एकमुखी असले तरी त्यांच्यानंतरच्या फळीतील नेता जिल्हा पातळीवर नाही. यंदा प्रथमच पवार घराण्यातील तिसरी पिढीही राजकारणात उतरत आहे. शरद पवार यांचे थोरले बंधू अप्पासाहेब पवार यांचे नातू रोहित बारामती तालुक्यातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे पुणे जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादीने सर्व ताकद पणाला लावली आहे. परंतु, अगदी अजित पवारच दोन दिवसांपूर्वी बारामतीत बोलल्याप्रमाणे पुणे जिल्ह्यात तरी राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव राष्ट्रवादी काँग्रेसच करू
शकते.
त्यामुळे अंतर्गत नाराजी शमविण्यात पक्षाला कितपत यश मिळते आणि विरोधक त्याचा फायदा घेण्यात यश मिळवू शकतात का यावरच जिल्हा परिषदेच्या सत्तेचे गणित ठरणार आहे.

Web Title: Time to fight against NCP for power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.