भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कांदा रस्त्यावर फेकण्याची शेतकऱ्यांवर वेळ : नाना पटोले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 08:28 PM2023-02-25T20:28:30+5:302023-02-25T20:28:58+5:30
कांद्यावरील निर्यातबंदी उठवा व १५०० रुपये हमी भाव द्या, पटोले यांची मागणी
भारतीय जनता पक्ष शेतकरीविरोधी असून केंद्र व राज्यातील भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. कापूस, सोयाबीनला भाव नाही तसेच कांद्याचे भावही घसरले आहे. कांदा काढणीच्या खर्चाएवढाही भाव बाजारात नसल्याने हजारो शेतकरी कांदा शेतातच कुजवत आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्याला आधार देण्यासाठी कांद्याची निर्यातबंदी उठवावी, कांद्याला १५०० रुपये हमी द्यावा अथवा क्विंटलला एक हजार रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या राजवटीत शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. भाजपा व मोदी सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी नाही तर काही मोजक्या उद्योगपतींसाठीच काम करत असल्याचे उघड झाले आहे. उद्योगपतींचे कोट्यावधी रुपयांचे कर्ज माफ करते पण शेतकऱ्यांना देण्यास भाजपा सरकारकडे पैसे नाहीत. सध्या बाजारात कांद्याचे भाव घसरलेले आहेत. बाजारात कांद्याला ४०० ते ५०० दर मिळत आहे. या दरातून कांद्याचा उत्पादन खर्चही निघत नाही. कांद्याचे घसरलेले भाव पाहून शेतकरी हवालदिल झाला आहे. तर सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे.
ही शेतकऱ्याची क्रूर थट्टा
भाजपा सरकारच्या काळात कांदा, सोयाबीन, कापूस या मालालाही भाव नाही. आधीच आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी आणि त्यात बाजारात पडलेले भाव यात तो पुरता पिचला गेला आहे. सोलापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या ५०० किलो कांद्याला एक रुपया किलोप्रमाणे भाव मिळाला व खर्चाची वजावट करुन केवळ २ रुपयांचा धनादेश त्या शेतकऱ्याच्या हातात पडला. ही शेतकऱ्याची क्रूर थट्टा आहे. मागील वर्षी पुणे जुल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एका तरुण शेतकऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी त्यांना पत्र पाठवून आत्महत्या केली. विदर्भातही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे परंतु भाजपाला शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. कांदा, कापूस, सोयाबीनसह शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे अन्यथा शेतकऱ्यांच्या आक्रोशाला भाजपा सरकारला तोंड द्यावे लागेल, असा इशाराही पटोले यांनी दिला आहे.