यंदाही मुलींची बाजी

By Admin | Published: May 31, 2017 05:01 AM2017-05-31T05:01:45+5:302017-05-31T05:01:45+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी/मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल

This time the girls' stake | यंदाही मुलींची बाजी

यंदाही मुलींची बाजी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी/मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल ८९.५० टक्के इतका लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या ३ टक्क्यांनी वाढली आहे. निकालामध्ये यंदाही कोकण विभाग अव्वल ठरला असून पुणे विभाग तिसऱ्या क्रमांकावर तर मुंबई विभाग शेवटच्या क्रमांकावर आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी बुधवारी सकाळी निकालाची माहिती दिली. या वेळी मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील उपस्थित होते. विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजता आॅनलाइन निकाल उपलब्ध करून देण्यात आले.
परीक्षा मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या ९ विभागांमध्ये अव्वल ठरण्याची परंपरा कोकण विभागाने यंदा कायम राखली आहे. कला, वाणिज्य, विज्ञान व व्यवसाय अभ्यासक्रमाच्या एकूण १४ लाख २९ हजार ४७८ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी १२ लाख ७९ हजार ४०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा बारावीच्या परीक्षेसाठी ७३ हजार ९२६ पुनर्परीक्षार्थींपैकी २९ हजार ७७९ उत्तीर्ण झाले असून, त्यांच्या निकालाची टक्केवारी ४०.८३ टक्के इतकी आहे. अपंग विद्यार्थ्यांचा निकाल ९३.०१ टक्के लागला आहे.

गुणपत्रिका मिळणार ९ जूनला
आॅनलाइन निकाल जाहीर झाला तरी गुणपत्रिका ९ जून रोजी दुपारी ३ वाजता कॉलेजात मिळेल. गुणपडताळणीसाठी ३१ मे ते ९ जून या कालावधीत अर्ज करता येणार आहेत.

आजपासून करता येणार गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी अर्ज
परीक्षेचा आॅनलाइन निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. त्यानंतर लगेचच आजपासून (बुधवार) गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी अर्ज करता येणार आहे.
यासाठी आवश्यक अर्जाचा नमुना मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. गुणपडताळणीसाठी गुणपत्रिकेच्या स्वयंसाक्षांकित प्रतीसह ३१ मे ते ९ जूनपर्यंत विहीत शुल्क भरून अर्ज करता येणार आहे.
उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी प्रति विषय ४०० रुपये शुल्क रोखीने अथवा डिमांड ड्राफ्टने मंडळाकडे जमा करावे लागेल.

फेरपरीक्षा ११ जुलैला
नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष फुकट जाऊ नये, म्हणून दहावीप्रमाणे यंदा बारावीच्या नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे. फेरपरीक्षा ११ जुलै रोजी घेण्यात येईल, असे राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी जाहीर केले.

ठळक वैशिष्ट्ये
मुलींच्या निकालातील दबदबा
कायम, एकूण ९३.०५ टक्के उत्तीर्ण
मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ८६.६५%
अपंग विद्यार्थ्यांचा निकाल ९३.०१%
एकूण १६२ विषयांची परीक्षा झाली, त्यापैकी ११ विषयांत सर्व मुले पास
खासगीरीत्या परीक्षेत बसलेले
६८.४६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
विज्ञान शाखेतील ९५.८५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत
वाणिज्य शाखेतील ९०.५७%
कला शाखेतून ८१.९१ %
व्यवसाय अभ्यासक्रम ८६.२७%
खासगीरीत्या परीक्षा देणाऱ्यांपैकी ६८.४६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

Web Title: This time the girls' stake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.